
येत्या काही दिवसांत तिन्ही ऋतूंचा अनुभव येण्याचा अंदाज
कल्याण डोंबिवली दि.1 मार्च :
एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे अद्याप उन्हाळ्याला नीटशी सुरुवातही झाली नसताना कल्याण डोंबिवलीत फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवशी मोसमातील पहिल्या 40 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येणारे काही दिवस आपल्याला पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा तिन्ही ऋतूंचा अनुभव येण्याचा अंदाज खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी वर्तवला आहे. (Sudden temperature rise in Kalyan Dombivli )
यंदाच्या वर्षी थंडीने ओढ दिली असली तरी फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात वातावरणाचा पारा अचानक घसरला. आणि तसाच महिन्याच्या शेवटच्या दिवशी तर तापमानात मोठा बदल झाला. यंदाच्या मौसमातील पहिल्याच 40 अंश सेल्सिअस तापमानाने गुरुवारी कल्याण डोंबिवलीकरांना चांगलाच घाम फोडला.
तर वातावरण बदलातील ही प्रक्रिया नैसर्गिक आणि सामान्य आहे. थंडीच्या ऋतूकडून उन्हाळ्याच्या दिशेने वाटचाल होत असताना अशाच प्रकारे वातावरण बदल जाणवत असल्याची प्रतिक्रिया हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
तसेच गुरुवारी अचानक हे चाळीस डिग्री सेल्सिअस असले तरी पुढील काही दिवस तापमानात घट जाणवणार आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण, पावसाचा शिडकावा, गर्मीची लाट असे विचित्र वातावरण अनुभवायला मिळणार आहे. तर मार्च महिन्यात उत्तर भारतात पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्स) हा सक्रीय असतो. त्याचा परिणाम अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वाहू लागतात. त्यामुळे आपल्याकडे ढगाळ आणि पावसाळी वातावरण तयार झाले आहे. पुढील दोन दिवस असेच वातावरण राहणार असून 3 मार्चपासून उत्तरेकडील गार हवा आल्याने थंडीसारखी अनुभूती येईल. त्यामुळे पुढील काही दिवस आपल्याला उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळी असे संमिश्र वातावरण अनुभवायला मिळणार आहे. येत्या 4,5, आणि 6 मार्चला पहाटेच्या वेळेस पुन्हा थंडी जाणवेल. तर 7- 8 मार्चनंतर पुन्हा एकदा उन्हाळ्यातील वातावरण निर्माण होणार असल्याची माहिती मोडक यांनी दिली.
29 फेब्रुवारी 2024 रोजीचे तापमान
कल्याण डोंबिवली – 40.2 डिग्री सेल्सिअस
बदलापूर – 39.9
ठाणे 40.1
वाशी – 38.2
मुंबई – 37.2
पनवेल – 39.3