![IMG-20230812-WA0047](https://www.localnewsnetwork.in/wp-content/uploads/2023/08/IMG-20230812-WA0047-640x317.jpg)
कल्याण दि.12 ऑगस्ट :
देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या घटनेला या वर्षी 76 वर्षे पूर्ण होणार असून सध्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धूम धडाक्यात साजरा होतोय. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून ते आपला देश ज्या उंचीवर पोहोचला आहे, त्यामध्ये महिला वर्गाचे प्रचंड मोठे योगदान आहे. गेल्या काही वर्षांत शासकीय – निमशासकीय स्तरावर महिलांसाठी राबवण्यात आलेल्या विविध योजनांचीच ही फलश्रुती असून त्यामध्ये मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पानेही आपले महत्वपूर्ण योगदान दिल्याचे दिसून येत आहे.
देशाला इथपर्यंत आणण्यात महिला वर्गाचाही सिंहाचा वाटा…
जगाची पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेल्या आपल्या देशाला इथपर्यंत आणण्यात महिला वर्गाचाही सिंहाचा वाटा आहे. हे कोणीही नाकारणार नाही. मग ते कितीही अवघड समजल्या जाणाऱ्या प्रगत क्षेत्रांमधील मोठी जबाबदारी असो की देशाच्या अत्यंत ग्रामीण भागांत राहून केलेलं छोटे काम असो. या प्रत्येक ठिकाणी महिला वर्गाने आपल्या कामाची छाप सोडत ‘हम भी किसीसे कम नहीं’ हेच दाखवून दिले आहे. गेल्या काही वर्षांत महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासह समाजामध्ये आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी शासकीय असो की खासगी अशा दोन्ही स्तरांवर अनेक प्रयत्न केले जात आहेत.
ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष उपक्रमांतर्गत इलेक्ट्रिकलचे प्रशिक्षण…
मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प, वेगाने घोडदौड करणाऱ्या देशाच्या आर्थिक इंजिनाला अखंड वीजपुरवठा प्राप्त करून देण्यासाठी कटीबद्ध असणारी संस्था. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम करण्यासोबतच मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पातर्फे महिलांना ताकद देण्यासाठीही विविध प्रकल्प राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागातील तब्बल अठरा महिलांना विशेष उपक्रमांतर्गत इलेक्ट्रिकलचे प्रशिक्षण देण्यात आले. ज्यामुळे वायरिंग, होम अप्लायंससह इतर इले्ट्रॉनिक वस्तूंची दुरूस्ती करण्याचे कौशल्य त्यांच्यात निर्माण झाले आहे. या सर्व कामांच्या माध्यमातून या महिला आता स्वतःच्या ताकदीवर अतिशय सक्षमपणे आपल्या कुटुंबाचा आर्थिक भार लिलया उचलत आहेत. तर यापैकी काही महिलांना सखोल प्रशिक्षणासाठी आयटीआयमध्ये दोन वर्षांच्या कोर्ससाठीही प्रवेश घेऊन देण्यात आला आहे.
महिलांना सबळ करण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्गाचा पुढाकार…
ज्याप्रमाणे एखादी गृहिणी आपल्या घराचा, कुटुंबाचा अतिशय सक्षमपणे गाडा हाकत असते. त्याचप्रमाणे देशाला पुढे नेण्यासाठी, प्रगत करण्यासाठी महिला वर्गाचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. नेमका हाच धागा ओळखून मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पातर्फेही महिलांना सबळ करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.
मला अतिशय आनंद होत आहे की मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाने उपलब्ध करून दिलेल्या या इलेक्ट्रॉनिक कोर्समुळे मीही आता माझे घर चालवण्यासाठी हातभार लावू शकेल. तसेच इतर स्त्रियांनीही पुढे येऊन हा कोर्स करण्यासाठी प्रयत्न करीन.
– निकिता भोईर,
मी बारावी उत्तीर्ण असून मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाने उपलब्ध करून दिलेल्या या कोर्समुळे मला लगेचच नोकरीची नविन संधी मिळाली आहे. आता मी स्वतःच्या शिक्षणाचा खर्च करून घरातही थोडे पैसे देऊ शकेल. या गोष्टीचा मला आणि माझ्या कुटुंबीयांना अतिशय आनंद तसेच अभिमान आहे.
– श्रुती साळुंखे