Home ठळक बातम्या केडीएमसीच्या पाठपुराव्याला यश; 90 लाखांची कर थकबाकी पेट्रोलियम कंपनीने केली जमा

केडीएमसीच्या पाठपुराव्याला यश; 90 लाखांची कर थकबाकी पेट्रोलियम कंपनीने केली जमा

कल्याण दि.6 डिसेंबर :
केडीएमसीने मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात सुरू केलेल्या कारवाईला यश येताना दिसत आहे. कल्याणातील नामांकित पेट्रोल पंपाचे कार्यालय सील केल्यानंतर या कंपनीने तब्बल 90 लाखांची थकबाकी केडीएमसीकडे जमा केली आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या आदेशाने आणि उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ब ‘ प्रभाग क्षेत्राचे कर अधीक्षक प्रमोद पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करून ही कर वसुली करण्यात आली आहे. (Success in KDMC follow-up; 90 lakhs tax arrears deposited by petroleum company)

कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड येथील रोशन पेट्रोल पंपाचे कार्यालय मालमत्ता कर थकवल्याने केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या आदेशाने आणि उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या “ब” प्रभागातील कर संकलन विभागातर्फे सील करण्यात आले होते. एखाद्या राष्ट्रीय कंपनीच्या पेट्रोल पंपाचे कार्यालय केडीएमसीने सील केल्याने एकच खळबळ उडाली होती. तर केवळ कार्यालय सील करूनच कर संकलन विभाग थांबला नाही, तर कर वसुलीसाठी या विभागाकडून सतत पाठपुरावाही सुरू होता.

तर हे कार्यालय सील केल्यानंतर काही दिवसांतच या कंपनीकडून थकीत कराच्या रकमेपैकी 7 लाख 82 हजार रुपयांचा भरणा केला होता. मात्र त्यानंतरही “ब” प्रभाग कर विभागाकडून उर्वरित थकीत रक्कम जमा करण्यासाठी या पेट्रोलियम कंपनीकडे कायद्याच्या अखत्यारीत पाठपुरावा सुरू केला होता. या पाठपुराव्याला दोन महिन्यांनंतर यश आले असून संबंधित पेट्रोलियम कंपनीकडून एकाच दिवशी थकीत कर रकमेचा 87 लाख 32 हजार 271 रुपयांचा धनादेश केडीएमसीकडे जमा केला आहे. तसेच यानंतरही कर वसुलीची ही कारवाई अशीच सुरू राहणार असून मालमत्ता कर थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपली रक्कम जमा करण्याचे आवाहन कर अधीक्षक प्रमोद पाटील यांनी केले आहे.

दरम्यान संबंधित पेट्रोलियम कंपनीकडून आज दुपारी 87 लाखांचा धनादेश केडीएमसी ब प्रभाग कार्यालयात जमा करण्यात आला. यावेळी कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे, प्रभाग क्षेत्र अधिकारी सोनम देशमुख, सहाय्यक आयुक्त स्नेहा कर्पे, कर अधीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह कर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा