कल्याण – डोंबिवली दि.3 ऑगस्ट :
उत्तराखंड येथील हरिद्वारमध्ये झालेल्या 9 व्या राष्ट्रीय स्टुडंट्स ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी अक्षरशः पदकांची लयलूट केलेली पाहायला मिळाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून खेळण्यासाठी ५१ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. ज्यामध्ये इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या डोंबिवली येथील चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांसह टिटवाळा येथील मेरिडियन शाळेच्या विद्यार्थिनीने विविध पदके मिळवत घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत योगा, बुद्धिबळ, कॅरम, कुस्ती, कराटे, कबड्डी, इत्यादी खेळांचा समावेश होता. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या डोंबिवली येथील चंद्रकांत पाटकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कॅरम स्पर्धेत ८ पदके ज्यामध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य तर बुद्धिबळ स्पर्धेत १ रौप्य पदक पटकावले.
१२ वर्षांखालील मुलं कॅरम –
नील विवेक म्हात्रे – सुवर्ण
वेदांत अमोल पाटणकर – रौप्य
प्रसाद सुहास माने – कांस्य
१४ वर्षांखालील मुली कॅरम –
आर्या अमित घाणेकर – सुवर्ण
केतकी उमेश मुंडल्ये – रौप्य
अवनी अविनाश परब – कांस्य
१७ वर्षांखालील मुले कॅरम –
अथर्व विवेक म्हात्रे – सुवर्ण
लक्ष्य अश्विन परब – रौप्य
१२ वर्षांखालील मुली बु्द्घिबळ
समृद्धी किरण दामले – रौप्य
सर्व खेळाडूंचे संघ प्रशिक्षक म्हणून विवेक म्हात्रे यांनी कामगिरी बजावली. इंडियन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सतीश नायक आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या प्रोत्साहन आणि प्रदीप साटम सरांचे मार्गदर्शन मुलांना खूप उपयोगी पडले.
टिटवाळा येथील निधी साळुंकेची सुवर्ण पदकाला गवसणी..
दरम्यान याच ऑलिंपिक स्पर्धेमध्ये टिटवाळा येथील मेरिडियन शाळेची विद्यार्थिनी निधी विशाल साळुंके हिनेही सुवर्ण कामगिरी केलेली पाहायला मिळाले. 12 वर्षांखालील मुलींच्या कॅरम स्पर्धेमध्ये निधीने अत्यंत चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. निधी सध्या सहाव्या इयत्तेत शिकत असून तिचे वडील महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. निधीने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.