सीसीटीव्ही फुटेजमध्ये भयंकर प्रकार कैद
टिटवाळा दि.7 डिसेंबर :
कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील महागणपतीच्या टिटवाळ्यातील एका गृहसंकुलाच्या परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात साठ वर्षांची वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. शरीराचे जागोजागी लचके तोडल्यामुळे या महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला मुंबईतील सर जे. जे. रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही.(Stray dogs attack elderly woman in Titwala; admitted in J. J. Hospital Mumbai)
टिटवाळ्यातील रिजन्सी सर्वम् गृहसंकुलाच्या पाठीमागे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास 60 वर्षांची एक महिला पायी चालली होती. या महिलेला पाहून या भागातील चार भटकी कुत्री तिच्या अंगावर धाऊन गेली. चारही कुत्र्यांनी एकाच वेळी हल्ला केल्याने महिला रस्त्यावर कोसळली. भटक्या कुत्र्यांनी कपडे फाडून शरीराला चावे घेऊन तिला घायाळ केले. या महिलेने सुरूवातीला कुत्र्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तथापी एकाच वेळी चारही कुत्री आक्रमकपणे हल्ला करत असल्याने तिला उठणेही शक्य झाले नाही. या हल्ल्यात गंंभीर जखमी झालेली महिला घटनास्थळीच बेशुध्द झाली. भटक्या कुत्र्यांनी या महिलेला ओढत गृहसंकुलाच्या दिशेने नेले. आक्रमक कुत्र्यांशी प्रतिकार करण्याची शक्ती संपल्याने ही महिला निपचित पडून होती. परिसरातील काही रहिवाशांसह गृहसंकुलाच्या रखवालदारांना हा प्रकार कळताच साऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे कुत्र्यांनी त्या महिलेला सोडून पळ काढला. जागरूक रहिवाशांनी तातडीने या महिलेला ॲम्बुलन्समधून गोवेली येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. हा सारा प्रकार रिजन्सी सर्वम् गृहसंकुल परिसरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे.
या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने गोवेली रूग्णालयात प्राथमिक उपचार करून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालया नेण्यात आले आणि तिथून तिला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात पाठविण्यात आले. मात्र या महिलेची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने तिला मुंबईतील सर जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.
टिटवाळात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर गोवेली शासकीय रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिकच्या उपचारासाठी जे. जे. रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.