Home ठळक बातम्या रिक्षांना शिस्त लावण्यासह बेकायदेशीर वाहतूक थांबवा; शिवसेनेच्या शिष्टमंडळाची आरटीओ अधिकाऱ्यांकडे मागणी

रिक्षांना शिस्त लावण्यासह बेकायदेशीर वाहतूक थांबवा; शिवसेनेच्या शिष्टमंडळाची आरटीओ अधिकाऱ्यांकडे मागणी

बसेसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी घेतली केडीएमटी व्यवस्थापकांची भेट

कल्याण दि.14 जानेवारी :
स्टेशन परिसरातील रिक्षांना शिस्त लावा, मीटरप्रमाणे भाडे आकारणी सुरू करा, शालेय विद्यार्थ्यांच्या बसेसची नियमित तपासणी करण्यासह बेकायदेशीर वाहतूक थांबवण्याची आग्रही मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कल्याण आरटीओ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात शिवसेनेचे उपनेते विजय साळवी, जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ तारे, शहरप्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज कल्याण आरटीओ कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तर ढेपाळलेल्या केडीएमटी परिवहन व्यवस्थे विरोधातही संबधित अधिकाऱ्यांची भेट घेत संताप व्यक्त केला.

कल्याण शहर झपाट्याने विकसित होत असले तरी शहरातील नागरिकांसाठी वाहतुकीची सोयीस्कर सार्वजनिक व्यवस्था अद्याप उपलब्ध नाही. अनेक रहिवासी हे रिक्षांवर अवलंबून असून या रिक्षांचे आणि त्यांच्या स्टँडचे सुयोग्य नियोजन करण्याची गरज यावेळी उपनेते विजय साळवी यांनी यावेळी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकूल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अधोरेखित केली. तसेच कल्याण शेजारील म्हारळ, मुरबाड आदी ठिकाणांहून कल्याणात होणारी सहा आसनी रिक्षांची बेकायदेशीर वाहतूक, त्यामुळे होणाऱ्या अपघातात जाणारे बळी तसेच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शाळेच्या किंवा खासगी बसेसच्या फिटनेसची तपासणी याकडेही या बैठकीत लक्ष वेधत कारवाईची आग्रही मागणी करण्यात आली.

तर कल्याण स्टेशन परिसर संपूर्णपणे रिक्षाचालकांनी व्यापून टाकला असून इतर वाहनांना त्याठिकाणी शिरण्यासही जागा नसते. स्टेशनवरून शेअरिंगनुसार रिक्षा सुटणे हे मान्य आहे मात्र शहरातील इतर ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीटरप्रमाणे भाडे आकारावे, अधिकृत रिक्षा स्टँडची यादी जाहीर करावी, शहरातील शेअर आणि थेट रिक्षाचे दरपत्रक फलक प्रत्येक ठिकाणी लावण्यात यावे. अशावेळी या रिक्षाचालकांचे नियंत्रण आणि नियोजन करण्याचे काम हे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

तर कल्याण डोंबिवली परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत शहरातील रिंगरूट सह इतर महत्त्वाच्या मार्गावर बसेस चलवाव्यात, इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवावी अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. तर नागरिकांना सुविधा पुरवण्याचे काम करण्याऐवजी अधिकारी वर्ग एसी कार्यालयात बसून केवळ थंडगार हवा खात असल्याचा घणाघाती आरोपही विजय साळवी यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केला आहे. तर महापालिकेच्या तिजोरीतून कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात असूनही शहरातील नागरिकांना पुरेशी बससेवा मिळत नाही. केडीएमटी परिवहन सेवा केवळ नवीन बसेस विकत घेऊन त्या नंतर भंगारात विकण्यासाठीच कार्यरत असल्याचा गंभीर आरोपही साळवी यांनी यावेळी केला.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केल्या या मागण्या…

स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांना शिस्त लावा,

मिटर नुसार भाडे आकारणी करा,

परवाना नसलेल्या खाजगी बसेसवर कारवाई करा,
जादा भाडे आकारणाऱ्या – भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करा,
शाळा बसेस, सरकारी वाहनांची फिटनेस तपासणी करून प्रमाणपत्र द्या,
सर्व रिक्षा स्टॅंडवर दरपत्रक फलक लावण्यात यावे.
रिक्षा चालकांचे परवाने आणि लायसन्सची तपासणी केली जावी.

या बैठकीत भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे , कल्याण शहर प्रमुख,सचिन बासरे ,उपशहर प्रमुख,विजय काटकर, दत्ता खंडागळे, राजेंद्र दीक्षित, प्रदीप साळवी, दिनेश शेटे, आनिल गोवळकर, सुभाष पेणकर, अनिल डेरे, निलेश भोर, सतीश वायचळ,हेमंत बागवे, सुधीर कंक, उदय गावडे, राजेंद्र लोंढे, जयवंत टापरे, सचिन सोष्टे, महिला आघाडीच्या राजलक्ष्मी अंगारके ,सुनिता लेकावळे, मथुरा परदेशी आदी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा