
अशी यशस्वी सर्जरी करणारे ठाणेपलिकडील पहिलेच रुग्णालय
कल्याण दि.2 फेब्रुवारी :
कल्याणच्या वैद्यकीय क्षेत्रात अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत आपला वेगळा ठसा उमटवलेल्या जी प्लस हार्ट सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये अतिशय परिणामकारक आणि अत्याधुनिक समजली जाणारी “मिनीमल इनव्हेसिव्ह हार्ट सर्जरी” यशस्वीपणे करण्यात आली आहे. इतकी अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे होणारे जी प्लस ठाणेपलिकडील पहिले रुग्णालय ठरल्याने इथल्या डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. (State of the art “Minimal Invasive Heart Surgery” performed at G Plus Heart Hospital, Kalyan)
कमी वय पाहता ओपन हार्ट ऐवजी मिनीमल इनव्हेसिव्ह हार्ट सर्जरीचा सल्ला…
चालताना धाप लागत असल्याने खोपोली येथे राहणाऱ्या कविता हजारे (वय ४० वर्षे)या तीन दिवसांपूर्वी कल्याणातील जी प्लस हार्ट रुग्णालयात आल्या. या रुग्णालयाचे हृदयविकार तज्ज्ञ (cardiologist) डॉ. अमोल जी. चव्हाण यांच्याकडून त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. हृदयाच्या या तपासण्यांमध्ये डॉ. चव्हाण यांना काहीशी अनियमितता दिसून आली. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीची झडप (valve) योग्य पद्धतीने कार्यरत (arotic valve stenosis) नसल्याचे या तपासण्यांमध्ये आढळून आले. तर कविता यांचे कमी असणारे वय पाहता ओपन हार्ट सर्जरीऐवजी नवी आणि परिणामकारक पद्धती म्हणून उदयास आलेल्या मिनीमल इनव्हेसिव्ह हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला डॉ. अमोल चव्हाण यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिला. आणि त्यांच्या कुटुंबियांनीही डॉ. चव्हाण यांच्यावर पूर्णपणे विश्वास दाखवत या नव्या आधुनिक उपचार पद्धतीसाठी मान्यता दिली.
जी प्लस हार्ट हे ठाणेपलीकडील पहिलेच रुग्णालय…
सायन रुग्णालयातील सुप्रसिद्ध हृदयरोग शल्य विशारद (heart surgeon) डॉ. वैभव शहा यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने जी प्लस रुग्णालयात ही मिनीमल इनव्हेसिव्ह हार्ट सर्जरी यशस्वीपणे करत कविता यांना पुढील धोक्यातून सुखरूप बाहेर काढले. तब्बल 8 तास चाललेली ही शस्त्रक्रिया डॉ. शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक प्रयत्नांनी यशस्वी करून दाखवली. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर लगेचच कविता यांच्या तब्येतीत अतिशय चांगली सुधारणा दिसू लागली आहे. अशा प्रकारची आधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे जी प्लस हार्ट हे ठाणेपलीकडील पहिलेच रुग्णालय ठरले असल्याची माहिती हृदयविकार तज्ज्ञ डॉ अमोल जी. चव्हाण यांनी दिली आहे.
ओपन हार्ट आणि मिनिमल इनव्हेसिव्ह सर्जरीमध्ये हा आहे फरक…
जुन्या ओपन हार्ट सर्जरीमध्ये रुग्णाच्या शरीरावर मानेच्या खालच्या भागापासून ते पोटापर्यंतचा भागाला काप द्यावा लागतो. ज्यामुळे शरीरावर अधिक मोठी जखम होऊन रुग्ण बरा होण्यासही बराच कालावधी लागतो. तर मिनिमल इनव्हेसिव्ह सर्जरीमध्ये अत्यंत कमी भागात काप देऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. यामध्ये ओपन हार्टपेक्षा लहान जखम असल्याने रुग्ण लवकर बरा होतो. विशेष म्हणजे कमी वय असणाऱ्या रुग्णांच्या भवितव्याचा विचार करता जगभरात ही नवी आणि परिणामकारक शस्त्रक्रिया चांगलीच पाय रोवू लागल्याची माहिती हृदयरोग शल्य विशारद (heart surgeon) डॉ. वैभव शहा यांनी दिली आहे.