खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
डोंबिवली दि.29 जुलै :
कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली शहराच्या पूर्व भागात असलेल्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीच्या जागेवर अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशा कर्करोग आणि सुतिकागृह रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक कर्करोगग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. याच इमारतीत सुतिकागृहासाठी ५० खाटांचा समावेश असेल. महापालिकेच्या वतीने या रुग्णालय उभारणीची निविदा जाहीर करण्यात आली आहे.
गेले काही वर्ष वापराविना पडून असलेल्या या इमारतीच्या जागेवर कर्करोग रुग्णालय उभारणीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा सुरु होता. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हेदेखील या रूग्णालयाच्या उभारणीसाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून ठाणे जिल्ह्याला लवकरच एक सुस्सज असे कर्करोग रुग्णालय मिळणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात डोंबिवली पूर्व येथील सुतिकागृह रुग्णालयातून १९५० पासून सर्व गरजू स्त्रियांना, नागरिकांना आरोग्य विषयक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत होत्या. सुमारे ३० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयाची इमारत धोकायदायक झाल्याने समोर आल्याने २०१३ पासून वापराकरिता बंद करण्यात आली होती. या ठिकाणची वैद्यकीय सुविधा अन्य रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आली होती. या सुतिकागृह रुग्णालयाचा भूखंड डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून या भूखंडाचे क्षेत्रफळ ३ हजार २१९.२० चौरस मीटर इतके आहे. सोबतच मंजूर विकास योजनेमध्ये या भूखंडावर ‘अस्तित्वातील वापर’ असे आरक्षण आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आपल्या मतदारसंघातील नागरिकांना चांगल्या आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असतात. स्थानिकांच्या मागणीनंतर या २०१६ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार या भूखंडावर सार्वजनिक- खासगी- भागीदारी तत्त्वावर(ppp) आधुनिक सुतिकागृह व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विकसित करण्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली कर्करोग निदान आणि उपचार केंद्र संकल्पना…
या कामासाठी २०१८ मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर २०१९ – २०२० साली करोनाचा प्रादुर्भाव आल्याने आणि काम करण्यास येणाऱ्या अडचणी पाहता निविदा रद्द करण्यात आली होती. यानंतर २०२० मध्ये महाराष्ट्र शासनाने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू केल्याने भूखंडाच्या विकसनशील क्षमतेत वाढ झाली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या भूखंडावर कर्करोग निदान व उपचार केंद्र उभारण्याची संकल्पना मांडली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालय उभारणीला दिली मंजुरी…
यानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मक नागरिकांच्या हितासाठी रुग्णालय उभारणीला मंजुरी दिली. याच बरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचेही याकामात सहकार्य लाभले. याबाबत खासदार डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आभार मानले आहेत. नुकतीच या कामासाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता येथे कर्करोग रूग्णालय मार्गी लागणार आहे.
सार्वजनिक- खासगी – भागीदारी तत्त्वावर प्रकल्प…
रुग्णालयात एकूण १ लाख ४५ हजार ४७५ चौरस फुटाचे बांधकाम प्रस्तावित असून रेडिएशन थेरपीसाठी आवश्यक उपकरणासहित रुग्णालय प्रस्तावित केले आहे. तर प्रकल्पास मोठ्या प्रमाणात गुंतवणूक अपेक्षित असून सार्वजनिक- खासगी – भागीदारी तत्त्वावर प्रकल्प करावयाचा असल्याने त्याचे परिचलन तीस वर्षे कालावधीसाठी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या प्रकल्पातील वैद्यकीय सुविधा सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात देता येण्यासाठी वैद्यकीय सुविधांचे दर, केंद्रशासन आरोग्य दर सूचीनुसार सीमित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सुतिकागृहातील उपचार हे स्त्री रुग्णांकरिता व बालकांकरीता पूर्णपणे विनाशुल्क राहणार आहेत. प्रकल्प आर्थिक दृष्ट्या सुसाह्य होण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रकल्प खर्चाच्या ३०% पर्यंत अर्थसहाय देण्यासाठी महाराष्ट्र शासनास विनंती केली आहे. या रुग्णालयाच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार आहे.
असे असणार हे रुग्णालय…
रुग्णलयाच्या तळघरात न्यूक्लिअर थेरपी विभाग, तळमजल्यावर स्वागत कक्ष, बाह्य रुग्ण विभाग व औषधालय, पहिला मजल्यावर वाहनतळ, दुसरा ते पाचवा मजल्यावर कर्करोग रुग्णालय (एकूण १०० खाटा ) आणि सहावा ते आठवा मजला- सुतिकागृह (एकूण ५० खाटा ) असणार आहे.