हल्ला झालेल्या डोंबिवलीतील भाजपच्या पदाधिकाऱ्याची घेतली भेट
डोंबिवली दि.4 मार्च :
आपल्याला सध्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि त्या गुन्हेगारीकरणाला असणारे शासनाचे संरक्षण अत्यंत गंभीर असल्याचा हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी हल्ला झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर ही तोफ डागली.
महाराष्ट्र अधोगतीकडे चाललेला असून महाराष्ट्रातील पोलीस दल हे इतक्या राजकीय दबावाखाली कधीच काम करत नव्हते. परंतु महाराष्ट्रातील पोलीस दलावर सध्या असलेला राजकीय दबावाचे आपल्याला आश्चर्य वाटत आहे. आणि हे महाराष्ट्राच्या हिताचे नसून महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी हे अतिशय घातक असून याचा विरोध झालाच पाहिजे असे टीकास्त्रही विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी यावेळी राज्य सरकारवर सोडले.
तसेच भाजप कार्यकर्त्यावर हल्ला होऊन चार दिवस उलटले तरी पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही ही शोकाची आणि गंभीर बाब आहे. जर आरोपीला लवकर अटक झाली नाही तर आम्ही स्वतः इथे डोंबिवलीत येऊन मोर्चा काढू तसेच विधानसभेतही हा विषय मांडू असे वक्तव्यही फडणवीस यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार रविंद्र चव्हाण, गणपत गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.