शिवसेना उद्धव ठाकरे गटान घेतली केडीएमटी व्यवस्थापकांची भेट
कल्याण दि .1 नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवली शहरांतर्गत केडीएमटी बसेसच्या फेऱ्या सुरु करुन प्रवाशांना दिलासा द्यावा, अन्यथा परिवहन कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे देण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी, शहरप्रमुख सचिन बासरे यांच्या शिष्टमंडळाने केडीएमटी व्यवस्थापकांची घेतलेल्या भेटीत हा इशारा देण्यात आला. (Start KDMT intra-city service immediately, otherwise it will be suspended)
केडीएमटी सेवेत असणाऱ्या बसेस शहराबाहेर चालविल्या जातात. महापालिका क्षेत्रातील नागरीकांना त्याचा उपयोग होत नाही. रिक्षाचालक आणि खासगी वाहने अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करतात. परिवहनच्या बसेस आधी सुरु होत्या त्या बंद का केल्या? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती यावेळी केडीएमटी व्यवस्थापकांवर करण्यात आली. तसेच अंतर्गत बसेस सुरू नसल्याने नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा जाब विचारण्यात आला. तसेच लवकरात लवकर अंतर्गत बसेस सुरू झाल्या नाहीत तर थेट परिवहन कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी संतप्त पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी महिला आघाडीच्या विजया पोटे, हर्षवर्धन पालांडे, अरविंद पोटे, रविंद्र कपोते, विजय काटकर, दत्तात्रय खंडागळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान नवे मार्ग सुचविले आहे, जे पूर्वी चालू होते, जे काही कालावधीपासून बंद आहेत ते मार्ग सुरु करण्यावर आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. ते मार्ग आम्ही सुरु करणार आहोत. २०१७ मध्ये असलेली बसेसची संख्या आणि आजची बसेस संख्या यात कमालीचा फरक आहे. आमच्याकडे ९० बसेस आहेत. त्यापैकी ८० बसेस रस्त्यावर धावतात. अशी प्रतिक्रिया परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांनी दिली.