या केंद्रामुळे मतदारसंघातील कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, दिवा, कळवा आणि मुंब्रा येथील लाभार्थ्यांना मिळणार आरोग्य सुविधा…
नवी दिल्ली दि.10 डिसेंबर :
केंद्र सरकारच्या आरोग्ययोजना (CGHS) अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आदी लाभार्थ्यांना आरोग्य सेवा पुरविल्या जात असून सध्या १२ लाख प्राथमिक कार्डधारक आणि ३७ लाख लाभार्थी आहेत. कल्याण लोकसभा क्षेत्रात या आरोग्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या मोठी असून यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी, लहान मुले, महिला आणि वृद्ध देखील आहेत. केंद्र सरकारच्या या आरोग्य योजनेअंतर्गत मुंबई विभागीय क्षेत्रात एकूण २६ (CGHS) आरोग्यसेवाकेंद्र आणि ओपीडी आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुंबई महानगर क्षेत्रात येत असून यापैकी एकमेव आरोग्य सेवा केंद्र अंबरनाथ येथे आहे. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदासंघातील लाभार्थ्यांना उपचारासाठी मुंबईला जावे लागते आणि त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याने कल्याण अथवा डोंबिवली येथे येथे (CGHS) आरोग्य केंद्र सुरु करण्याची आग्रही मागणी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी लोकसभा अधिवेशनाच्या शून्य प्रहर काळात केली.
मुंबई येथील (CGHS) आरोग्य केंद्रात जावे लागत असल्याने बरेच लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित रहात असून पर्यायाने त्यांना उपचारासाठी खाजगी आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात जावे लागत आहे. तेथील उपचारासाठीचा खर्च मोठा असल्याने या सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या खिशावर देखील मोठा ताण पडत आहे. कल्याण लोकसभा मतदारक्षेत्रातील कल्याण अथवा डोंबिवली येथे (CGHS) आरोग्य केंद्राच्या स्थापनेमुळे मतदारसंघातील कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, दिवा, कळवा आणि मुंब्रा येथील लाभार्थी असलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी, लहान मुले, महिला आणि वृद्धांचा उपचारासाठी मुंबईला जाण्यासाठीचा वेळ, त्रास आणि पैसा वाचेल तसेच या केद्रांत सुरळीत आणि योग्य प्रकारे आरोग्य सुविधा मिळतील असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.