डोंबिवलीतील मार्गदर्शन शिबिराला 5 हजारांहून अधिक महिलांची उपस्थिती
कल्याण दि.7 ऑक्टोबर :
सक्षम भगिनी योजनेत सहभागी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी महिला वर्गाला केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून सक्षम_भगिनी_योजना राबवण्यात येत आहे. या योजनेबद्दल महिला वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित शिबिरात ते बोलत होते. (Stand on your own feet by participating in Saksham Bhagini Yojana – Public Works Minister Ravindra Chavan)
डोंबिवली पूर्वेतील सावळाराम क्रिडा संकुलात उभारण्यात आलेल्या भव्य अशा नमो रमो नवरात्रौत्सवाच्या मंडपामध्ये आयोजित या शिबिरामध्ये तब्बल 5 हजारांहून अधिक महिला सहभागी झाल्याचे दिसून आले. डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील महिलांना स्वतःच्या पायांवर उभं राहता यावं यासाठी KSR उद्योग समूह आणि पासो फुड्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या सक्षम भगिनी योजनेच्या माध्यमातून उद्यमशील महिलांना एकही रुपया खर्च न करता, घरबसल्या, आपल्या सवडीनुसार खाद्य उद्योगात (फूड इंडस्ट्री) पाऊल टाकता येणार आहे. या उद्योगासाठी संपूर्ण रीतसर प्रशिक्षण देण्यात येणार असून तुमच्या हाताची चव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील महिला बचत गटांमधील भगिनींनी बनवलेले खाद्यपदार्थ आणि वस्तू सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना भेट दिल्या. यावेळी भाजपचे नेते पदाधिकारी, पासो फुड्सचे उद्योजक भोसेकर यांच्यासह अनेक महिला बचत गटांच्या सदस्या आणि हजारोंच्या संख्येने भगिनीवर्ग उपस्थित होता.