
डोंबिवली दि.28 फेब्रुवारी :
डोंबिवलीत मराठी भाषा दिनानिमित्त मनसेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली शहर मनसे शाखेतर्फे ‘एक दौड जवानांसाठी’ आयोजित करण्यात आली होती. गेट वे ऑफ इंडिया, मुंबई ते डोंबिवली अशी 65 किलोमीटरची दौड आयोजित करण्यात आली होती.
या दौडमध्ये 100 हुन अधिक नागरिक, खेळाडू , डॉक्टर सहभागी झाले होते. रात्री 12 वाजता गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथून धावपटूंनी धावायला सुरवात केली आणि सकाळी 9 वाजता डोंबिवलीत दाखल झाले. मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते सहभागी स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.
मराठी भाषा दिनानिमित्त आम्ही अनेक वर्षापासून कार्यक्रम करत असतो. राज ठाकरेंचे तर आम्हला स्पष्ट आदेश आहेत की मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम प्रत्येक शाखे-शाखेत झाला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आम्ही नियोजन देखील करत असतो, आम्हाला खरंच आनंद आहे की इतर पक्षदेखील त्याचे अनुकरण करत असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. मराठी भाषा वाढली पाहिजे आणि मराठी टिकलीही पाहिजे यासाठी आपण सर्वांनी दैनंदिन जीवनात त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्ष मनोज घरत, महिला अध्यक्ष मंदा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.