Home क्राइम वॉच पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधातील डोंबिवली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद ; काही शाळांनीही दिली सुट्टी

पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधातील डोंबिवली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद ; काही शाळांनीही दिली सुट्टी

भाजपकडून ठिकठिकाणी उग्र निदर्शने

डोंबिवली, दि.24 एप्रिल :
काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात आज सर्वपक्षीय डोंबिवली बंदची हाक देण्यात आली होती. त्याला दुकानदार, व्यावसायिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. यासोबतच डोंबिवलीतील काही शाळांनीही स्वतःहून आज सुट्टी जाहीर करत या बंदला पाठिंबा दर्शवला. (Spontaneous response to Dombivli bandh against Pahalgam terror attack; Some schools also declared holiday)

काश्मिरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले या तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे शहरात एकीकडे शोककळा तर दुसरीकडे तीव्र संताप अशा मिश्र भावना उमटत आहेत. अतिशय शोकाकुल वातावरणात बुधवारी रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर या तिघांचे पार्थिव अंत्यसंस्कारापूर्वी भागशाळा मैदानात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले असताना त्यावेळी भाजप नेते राहुल दामले यांच्याकडून गुरुवारी डोंबिवली बंदचे आवाहन करण्यात आले होते.

पहलगाममधील या भ्याड अतिरेकी हल्ल्याविरोधात डोंबिवलीसह संपूर्ण देशभरात संतापाची लाट दिसून येत आहे. 27 निष्पाप नागरिकांच्या मृत्यूने देशभरात काश्मीरसह ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. डोंबिवलीतील या बंदला गुरुवारी नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

सकाळपासून डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसर तसेच अंतर्गत रस्त्यांवर नेहमीपेक्षा कमी वर्दळ दिसून येत होती. नेहमी गजबजलेली बाजारपेठ आणि दुकानांमधील ग्राहकांची गर्दीच्या ठिकाणी आज पूर्ण उलटे चित्र दिसून येत आहे. विशेषतः डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागातील दुकाने, बाजारपेठा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आल्या असून व्यापाऱ्यांनीही या बंदमध्ये सहभागी होऊन आपला रोष व्यक्त केला.

तर या भ्याड अतिरेकी हल्ल्याविरोधात डोंबिवली भाजपकडून ठिकठिकाणी उग्र निदर्शने करण्यात येत होती. भाजप नेते राहुल दामले, शशिकांत कांबळे, नंदू परब, मितेश पेणकर आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केल्या जाणाऱ्या या निदर्शनांमध्ये महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्याही लक्षणीय होती. ज्यामध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. तर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांनीही प्रमुख चौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा