कल्याण दि.१३ जुलै :
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरच्या कल्याण पश्चिमेतील पारनाका आणि न्यू कल्याण केंद्र गांधारे शाखेच्या संयुक्त विद्यमाने कल्याणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून हे शिबीर घेण्यात आले.
दिंडोरी प्रणित मार्गाची गेल्या ७ दशकांपासून 20 टक्के अध्यात्म आणि 80 टक्के समाजकारण अशी वाटचाल सुरू आहे. कोविड काळातही गरजूंना अन्नदान, वस्त्रदानासह संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे राबवण्यात आली. तर पारनाका, कल्याण पश्चिम येथे झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पारनाका येथे झालेल्या रक्तदान शिबिराची सुरुवात हे कल्याणमधील प्रसिद्ध उद्योजक राजूदादा गवळी आणि उल्हासनगर रुग्णालयातील डॉक्टरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.
पारनाका केंद्राच्या मार्फत असे सामाजिक उपक्रम यापुढेही करणार असल्याचे प्रतिनिधी सेवेकरी स्वाती पाचघरे यांनी सांगितले. रक्तदान शिबिर झाल्यानंतर शासकीय रुग्णालय उल्हासनगर यांच्यातर्फे सेवा केंद्राला प्रशस्तीपत्रकही देण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये कल्याण पश्चिममधील अनेक स्वामी भक्त आणि सेवेकर्यांनी आपली उपस्थिती नोंदवली.