कल्याण दि.६ नोव्हेंबर :
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून सचिन बासरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारीच्या घोषणेनंतर सचिन बासरे यांनी मतदारसंघात ‘आम्ही सारे बासरे’ ही मोहिम जोमाने राबवली आहे. या मोहिमेला बुधवारी बल्याणि चौक ते मोहीली दरम्यान आयोजित पदयात्रेत चांगला प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
या पदयात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी उत्स्फूर्तपणे आपला पाठिंबा जाहीर केला. विशेषतः महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी महिलांनी स्वतःच्या समस्या मांडल्या. वाढती महागाई, रोजगाराची कमतरता, महिला उद्योजकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.
याबाबत उपाय म्हणून सचिन बासरे म्हणाले, “महिला बचत गटांच्या माध्यमातून आम्ही कल्याण पश्चिममध्ये आर्थिक स्वावलंबनाचा नवा अध्याय लिहू. रोजगाराच्या संधी निर्माण करणे, लघुउद्योगांना चालना देणे, आणि महिलांसाठी विशेष योजना राबवणे हे माझ्या प्राधान्यक्रमावर आहे. महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून महिला सक्षमीकरणासाठी व्यापक योजना आखण्यात येणार असल्याचेही बासरे यांनी जाहीर केले. “महिला उद्योगांचे व्यापक जाळे उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. महिलांनी पुढे येऊन आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत योगदान द्यावे,” असे आवाहन बासरे यांनी केले. “आपण ज्या विश्वासाने मला पाठिंबा दिला, त्याचे ऋण फेडण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. “महागाई आणि रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर महिलांचा आवाज बुलंद झाला आहे. त्यांच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी मी स्वतःला झोकून देईन,” असे सचिन बासरे यांनी पदयात्रेनंतर स्पष्ट केले.
या पदयात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या उपशहर संघटक अस्मिता गोवळकर, विभाग संघटक रोहिणी काटकर, उपविभाग प्रमुख संध्या ठोसर, शाखा संघटक शरयू सावंत आणि सुवर्णा आव्हाड उपस्थित होत्या.