कल्याण दि.१८ एप्रिल :
कल्याण पश्चिमेत नव्याने विकसित होणाऱ्या भागामध्ये असलेल्या प्रस्तावित स्मशानभूमीला सोसायटीतील रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत ही स्मशानभूमी दुसरीकडे हलवण्याची आग्रही मागणी या रहिवाशांनी केली आहे.
कल्याण पश्चिमेच्या वाडेघर भागामध्ये काही वर्षांपूर्वीच तब्बल अडीचशे फ्लॅट असणारे हे गृहसंकुल उभारण्यात आले आहे. यामध्ये यामध्ये अंदाजे दीड ते 2000 लोक वास्तव्य करीत आहेत. या गृह संकुलाच्या पश्चिम दिशेला स्मशानभूमी प्रस्तावित करण्यात आली असून नुकतेच तिचे भूमीपूजनही करण्यात आले आहे. मात्र या प्रस्तावित स्मशानभूमीवरून सोसायटीतील रहिवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
ही स्मशानभूमी गृहसंकुलाला अगदी जवळ उभारली जाणार असून सोसायटीच्या दक्षिण दिशेला आधीपासूनच एक स्मशानभूमी अस्तित्वात आहे. मात्र आता या प्रस्तावित नव्या स्मशानभूमीमुळे
सोसायटीतील रहिवाशांना मानसिक आणि शारीरिक त्रास होण्यासह लहान मुलांचे आरोग्यही धोक्यात येणार असल्याची प्रतिक्रिया सोसायटीतील रहिवाशांनी दिली लोकवस्तीच्या अगदी जवळच ही स्मशानभूमी उभारली जाणार असल्याने त्याचे अनेक दृश्य आणि अदृश्य परिणाम आम्हाला सहन करावे लागू शकतात. या संदर्भात आम्ही केडीएमसी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. आमचा स्मशानभूमीला अजिबात विरोध नाहीये. परंतु लोकवस्ती पासून काहीशा दूरच्या अंतरावर ती उभारण्यात यावी एवढीच आमची आग्रही मागणी असल्याचे या रहिवाशांकडून सांगण्यात आले.
दरम्यान या संदर्भात सोसायटीतील रहिवाशांनी बोलावलेल्या बैठकीला भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील उपस्थित होते. त्यांनीही सोसायटीतील रहिवाशांचा हा मुद्दा स्मशानभूमी दुसरीकडे हलवण्याचा मुद्दा ग्राह्य धरत आपण या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन या फ्लॅटधारकांना दिले. यावर आता केडीएमसी प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे.