के. सी. गांधी शाळेच्या सभगृहात झाला दिमाखदार सोहळा
कल्याण दि. ७ नोव्हेंबर :
वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहून समाजाभिमुख काम करणाऱ्या व्यक्तींचा जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिड टाऊनकडून समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कल्याणच्या के. सी. गांधी शाळेच्या सभागृहात हा दिमाखदार सोहळा पार पडला.
बहारदार नृत्य, गायनाने कार्यक्रमाला वेगळीच रंगत…
कोवीडमुळे गेली दोन वर्षे कोणतेच कार्यक्रम किंवा सांस्कृतिक सोहळे आयोजित करता आले नाहीत. जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिड टाऊनकडून साजरा होणारा हा कार्यक्रमही त्याला अपवाद ठरला नाही. मात्र गेल्या दोन वर्षांची पुरेपूर कसर काल संध्याकाळी झालेल्या या सन्मान सोहळ्याने भरून काढलेली पाहायला मिळाली. एकीकडे जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिड टाऊनच्या सदस्यांकडून सादर केल्या गेलेल्या बहारदार नृत्य, गायनाने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. तर यावेळी जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिड टाऊनच्या सदस्यांनी अवयवदाना विषयीच्या जनजागृतीपर सादरीकरणाला उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात विशेष दाद दिली.
सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवाने कळसाध्याय…
दरम्यान आपापल्या क्षेत्रात राहून उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवाने या कार्यक्रमाचा कळसाध्याय रचला गेला. यावेळी ऑल इंडिया भारत गॅस डिस्ट्रीब्यूटर्स संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष (एसव्हीपी) किशोर सोढा, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सचिव संजय जाधव, कल्याणातील नामांकित प्रसूतीतज्ञ डॉ. आश्विन कक्कर यांच्यासह भिवंडीतील सामाजिक व्यक्तिमत्व इरफान बर्डी आदी व्यक्तींचा यावेळी समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिड टाऊनचे ज्येष्ठ सदस्य मनोहर पालन यांच्यासह गिरीश चितळे, विरेंद्र अय्यर, किशोर देसाई, राज कुमार, गगन जैन, डॉ. संजय पवार, नुर खान आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिड टाऊनच्या सर्वच पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.