भाजप कल्याण मंडळ अध्यक्ष वरुण पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
कल्याण दि.9 ऑगस्ट :
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा आमदार असतानाही शिवसेनेने मागणी केली आहे. तर त्यांचा आमदार असलेल्या जागेसाठी भाजपने मागणी केली तर त्यात गैर काय अशी भूमिका माजी केंद्रीय मंत्री, कपिल पाटील यांनी व्यक्त केली आहे. कल्याण पश्चिम भाजप मंडल अधक्ष वरुण पाटील यांच्या जनसेवालय या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना पाटील यांनी ही भूमिका व्यक्त केली. (…So what’s wrong with the seats where Shiv Sena MLAs are – Former Union Minister Kapil Patil)
भाजप त्यांच्या पाठीशी उभे राहून प्रामाणिकपणे काम करणार…
विधानसभेच्या जागांबाबात भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी यांनी पक्षाच्या बैठकीत विषय मांडला होता. मात्र मुरबाडमधील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्याठिकाणी आपल्याला जाता आले नाही. परंतु विधानसभा जागांबाबत पक्षाने भूमिका मांडली असून याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर, राज्यस्तरावर होणार आहे. मात्र ही मागणी पूर्ण झाली नाही, तरी शिवसेना असो की राष्ट्रवादीचा उमेदवार, भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी उभे राहून प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सूतोवाचही कपिल पाटील यांनी यावेळी केले.
वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकाचे स्वागत करतो…
संसदेत मांडण्यात आलेल्या वक्फ बोर्ड दुरूस्ती विधेयकाचे आपण स्वागत करून असून हा अतिशय क्रांतिकारी निर्णय आहे. जी गोष्ट आधीच्या सरकारने करायला पाहिजे होती ते काम मोदीजींनी केले आहे. अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजिजू यांनी वक्फ बोर्ड कसा चालतो याची संपूर्ण माहिती सभागृहाला दिलेली आहे. भारत पाकिस्तान फाळणीनंतर भारतात परतलेल्या मुस्लिम बांधवांच्या सर्व जमीनी पाकिस्तान सरकारने आपल्या ताब्यात घेतल्या. मात्र पाकिस्तानात गेलेल्या आपल्याकडील मुस्लिम बांधवांच्या जागा वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आल्या. ही विसंगती पाहता सर्वसामान्य मुस्लिम बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आलेले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
बांग्लादेशमधील हिंदूंवरील हल्ले लवकरच थांबतील…
बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे तिथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. परराष्ट्र मंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या स्टेटमेंटमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली असून हिंदूंवर होणारे हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच बांगलादेशमधील लष्कर प्रमुखांशी आपल्या देशातील नेत्यांचे बोलणे सुरू आहे. त्यामुळे निश्चितपणाने ही परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल. मात्र अशा प्रकारचे हल्ले अजिबात स्वीकारले जाणार नाहीत, धर्मांधपणे काम करणारी मंडळी अशा प्रकारचे हल्ले करत असून तिथले लष्कर आणि नव्याने स्थापन होणारे अंतरिम सरकार यांच्यामार्फत तिथल्या हिंदूंना संरक्षण देण्यासाठी नरेंद्र मोदी जी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर भारतीय जनता पार्टीची राजकारणाबरोबर समाजकारण करण्याची परंपरा आहे. या जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून वरुण पाटील हे इथल्या लोकांच्या समस्यांचे निराकरण करतील. तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील असा विश्वासही कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक अर्जुन म्हात्रे, अर्जुन भोईर, माजी नगरसेविका डॉ. शुभा पाध्ये, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी, शहराध्यक्षा वैशाली पाटील, मंगल वाघ आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.