मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला संताप
कल्याण ग्रामीण दि.6 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात २ खासदार आणि ४ आमदार आहेत. परंतू त्यापैकी केवळ १ आमदार आणि १ खासदार यांच्याच मतदारसंघात स्मार्ट सिटीची कामे सुरु असल्याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी ठाणे जिल्हा समन्वय आणि सनियंत्रण समितीची बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सुरु होती. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासमोर ही नाराजी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटी महत्वाकांक्षी योजनेत कल्याण डोंबिवली महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या योजनेतील विकासकामे ही एक आमदार आणि एक खासदार यांच्याच मतदारसंघात सुरु असल्याचे सांगत मनसे आमदार राजू पाटील आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातही स्मार्ट सिटीअंतर्गत सॅटीस प्रकल्प बनवण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. फक्त ठराविक मतदारसंघांकडे लक्ष देऊन अन्य विधानसभाक्षेत्रांकडे दुर्लक्ष होत असल्याने उपस्थित दोन्ही आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अमृत योजनेच्या कामाचे ऑडिट …
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये केंद्र शासनाच्या अमृत योजनेचं काम सुरू आहे. मात्र हे काम करत असताना ठेकेदाराने रस्ते खोदून जलवाहिन्या टाकल्या आहेत. त्यामुळे शासनाने तयार केलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या ठेकेदाराची जबाबदारी आहे की रस्त्याची दुरुस्ती करून देणं अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसेच संबंधीत ठेकेदाराच्या कामाचे ऑडिट करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी बैठकीत केली. त्यानुसार लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार असल्याची माहिती केडीएमसीकडून देण्यात आली. या अमृत योजनेच्या कामाचा स्थानिक आमदारांसमवेत केडीएमसीने पाहणी दौरा करण्याच्या सूचनाही यावेळी केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी दिल्या.
लोकग्राम ब्रिजचे काम धीम्या गतीने…
कल्याण रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या लोकग्राम ब्रिजचे काम धीम्या गतीने सुरु आहे. या पुलाची उभारणी ही रेल्वेकडून करण्यात येणार असून त्यासंबंधित रक्कम कल्याण डोंबिवली महापालिकेकडून रेल्वेला सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र रेल्वेकडे पाठपुरावा केला जात नसल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर कल्याण डोंबिवली महापालिका याबाबत तातडीने पाठपुरावा करेल असं आश्वासन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांकडून यावेळी देण्यात आले. केडीएमसी,एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने हे काम संथ गतीने सुरु असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
दिव्याकडे लक्ष द्यायला हवं – केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रशासनाला सूचना
सोमवारी झालेल्या दिशा बैठकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील समस्यांचा पाढा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या समोर मांडला. यामध्ये प्रामुख्याने दिवा डम्पिंग,भंडार्ली डम्पिंग,स्वच्छता गृह, वाहतूक कोंडी, अर्धवट पूल आधी समस्यांचा पाढा वाचला. या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून दिव्याकडे लक्ष द्यायला हवं असं सूचित देखील ठाणे मनपाच्या अधिकाऱ्यांना करून दिले आहे.