तर संपूर्ण महामार्ग डिसेंबरपर्यंत होणार खुला
डोंबिवली दि.28 ऑगस्ट :
मुंबई-गोवा महामार्गाचे काम टाईम-बाऊंड चॅलेंज म्हणून स्वीकारले असून त्यातूनच या महामार्गाच्या परिस्थितीत चेंज येतोय. मुंबई गोवा महामार्गाची खड्डेमुक्त सिंगल लेन लवकरच वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचा पुनरुच्चार करत डिसेंबरपर्यंत संपूर्ण महामार्ग खुला करण्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. (Single lane of Mumbai Goa highway will be opened soon – Minister Ravindra Chavan reiterated)
मुंबई गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात खुले चर्चासत्र…
डोंबिवली पूर्व येथील डोंबिवली जिमखाना येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कोकण विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. रखडलेला मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न तडीस लागावा आणि कोकणवासीयांचा प्रवास खड्डेमुक्त आणि सुखकर व्हावा यासाठी गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने संघर्ष करणाऱ्या संस्था, पत्रकार, अन्यायग्रस्त शेतकरी, आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित कोकणवासी यांना या वेळी काम पूर्ण करण्यामध्ये आलेली आव्हानं, कामाची सद्यस्थिती तसेच उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी केलेलं नियोजन असे अनेक बारकावे समजावून सांगण्यात आले.
भूसंपादनासारखे प्रश्न सोडवताना सर्व कोकणवासियांनी साथ दिली…
कुठलंही जनहिताचं काम करताना लोकसहभाग आणि जनतेचं पाठबळ आपल्या पाठीशी असावं लागतं. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हा मंत्र दिला आहे. महामार्गाच्या कामातील अडचणी, विशेषतः भूसंपादनासारखे प्रश्न सोडवताना सर्व कोकणवासियांनी साथ दिली. म्हणूनच अवघ्या १ वर्षात हे शिवधनुष्य उचलून ते तडीस नेऊ शकल्याचे रविंद्र चव्हाण यावेळी म्हणाले.
..त्यांच्या डोळ्यावर राजकीय महत्वाकांक्षेची पट्टी
तर रखडलेल्या प्रश्नावर ज्यांना केवळ राजकीय स्वार्थच साधायचा असतो असे लोक काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. कारण त्यांच्या डोळ्यावर राजकीय महत्वाकांक्षेची पट्टी बांधली गेलेली असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. तर याउलट तो प्रश्न ज्यांच्या रोजच्या जगण्या-मरण्याचा असतो असे लोक आक्रस्ताळेपणा न करता समोरच्याचं म्हणणं समजून घेतात, पटलं तर पाठीशी उभे राहतात, खटकेल तिथे शंका विचारतात. हा अनुभवही या कार्यक्रमातून आल्याचे चव्हाण म्हणाले.
महामार्ग पूर्ण करायचाच या सकारात्मक मानसिकतेतून काम…
तर मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करायचाच या सकारात्मक मानसिकतेतून काम करतोय. एकदाही निराशावादी आणि नकारात्मक विचार केला नाही म्हणून येणाऱ्या प्रत्येकाला सोबत घेऊन चालतोय. आपण सर्वांनी सकारात्मक होऊन मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी योगदान देऊ या असे आवाहनही रविंद्र चव्हाण यांनी यावेळी उपस्थितांना केले.