सकल हिंदू समाजातर्फे कल्याणमध्ये श्रीराम नवमीनिमित्त भव्य मिरवणूक
कल्याण दि. 30 मार्च :
रामजी की निकली सवारी…रामजी की लिला है न्यारी. या काही दशकांपूर्वी आलेल्या सुप्रसिद्ध गाण्याची खरीखुरी अनुभूती आज कल्याणकरांना अनुभवायला मिळाली. निमित्त होते ते अर्थातच आज असणाऱ्या श्री रामनवमीनिमित्त निघालेल्या भव्य अशा पारंपरिक शोभायात्रेचे. सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आयोजित या शोभायात्रेत अनेक सामाजिक संस्था आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते.
तरुणाईची लक्षणीय उपस्थिती आणि उत्स्फूर्त सहभाग…
आज असणाऱ्या श्रीराम नवमीनिमित्त ऐतिकासिक दुर्गाडी किल्ल्यापासून ही मिरवणूक काढण्यात आली. ज्यामध्ये प्रभू राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमंतांच्या वेशभूषेत सहभागी झालेले कलाकार आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. त्यासोबतच अनेक सामाजिक संस्था आणि त्यांचे चित्ररथही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. याशिवाय शहरातील तरुणाई अत्यंत मोठ्या प्रमाणात या शोभायात्रेत आपली उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. ज्यांनी भारत का बच्चा बच्चा..जय जय श्रीराम बोलेगा या गाण्यावर अक्षरशः तल्लीन होऊन नृत्य केल्याचे दिसून आले. तसेच शेकडो तरुण, महिला भगिनी भगवे फेटे परिधान करत बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
पक्षभेद बाजूला ठेवत आनंदाने सहभाग…
याशिवाय ही मिरवणूक आणखी एका गोष्टीसाठी लक्षणीय ठरली. ती म्हणजे या मिरवणूकीत भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले पक्षभेद बाजूला ठेवत आनंदाने सहभाग घेतला होता. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप युवा पदाधिकारी विकी गणात्रा, सौरभ गणात्रा आदींची या मिरवणूकीत उपस्थिती होती. जय श्रीरामच्या जय घोषाने संपूर्ण कल्याण शहर दुमदुमून गेलेले पाहायला मिळाले.
ही तरुणाईच आपली संस्कृती आणि वारसा जतन करणार – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील…
आपली संस्कृती जतन करण्यासाठी तरुणांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. यंदा मोठ्या प्रमाणात ही तरुणाई या मिरवणुकीत सहभागी झाली. त्यामुळे याच तरुण पिढीच्या माध्यमातून येत्या काळात आपली संस्कृती टिकवली जाईल असा विश्वास केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सकल हिंदू समाजाने या मिरवणुकीत कुठलाही पक्षभेद न ठेवता सहभागी होऊन योगदान दिले आहे. पुढील वर्षी केवळ राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात मोठी शोभायात्रा काढण्यात येईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.