कल्याण – डोंबिवली दि.7 एप्रिल :
कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या रेमडीसीविर इंजेक्शनचा कल्याण डोंबिवलीमध्ये मोठा तुटवडा आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कल्याण पूर्वेतील एका मेडीकल दुकानाबाहेर हे इंजेक्शन घेण्यासाठी लोकांची झालेली गर्दी बघून कोणालाही हाच प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही.
कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवनविन रेकॉर्ड बनवत आहे. त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालये आणि जम्बो कोवीड सेंटर्सही रुग्णांनी तुडुंब भरू लागली आहेत. कोरोना रुग्णांसाठी रेमडीसीविर हे औषध अत्यंत परिणामकारक ठरत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच कोवीड रुग्णसंख्या चिंताजनकरित्या वाढल्याने साहजिकच या इंजेक्शनची मागणीही प्रचंड वाढली आहे. त्यामुळे ज्याठिकाणी हे इंजेक्शन मिळते त्या मेडीकल दुकानात लोकांच्या अक्षरशः मोठाल्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. कल्याण पूर्वेतील अमेय फार्मसी या दुकानात रेमडीसीविर घेण्यासाठी झालेली गर्दी पाहून उरात मोठी धडकी भरल्यावाचून राहणार नाही. कल्याणच्या या मेडीकलमध्ये हे इंजेक्शन घेण्यासाठी केवळ कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातूनच नव्हे तर थेट मुंबईवरूनही लोकं आलेले आहेत.
यातील काही जण तर सतत 3 दिवसांपासून हे इंजेक्शन घेण्यासाठी येऊन रांगेत उभे राहत आहेत.
त्यामूळे कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे की काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.