कल्याण दि.12 जानेवारी :
कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेल्या लॉकडाऊनमूळे चित्रपट उद्योगालाही मोठा फटका बसलाय. त्यातच लोकल सेवा सर्वांसाठी सुरू न झाल्याने अडचणीत आणखीनच भर पडली आहे. अशा कलाकारांना एक मदतीचा हात म्हणून कल्याणातील युवा दिग्दर्शक विनोद शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. क्लॅप क्रिएशन्स निर्मित आणि विनोद शिंदे दिग्दर्शित “डिटेक्टिव्ह रागिनी’ या वेब सिरीजचे चित्रीकरण कल्याणात केले जात आहे.
कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे अनेक नाट्य, सिनेमा क्षेत्रातील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुंबईत काही ठिकाणी शूटिंगला परवानगी दिली असताना कल्याणमधील स्थानिक कलाकारांना प्रवासाअभावी काम करणे जिकरीचे ठरत आहे. त्यामुळेच स्थानिक कलाकारांना मदतीचा हात म्हणून क्लॅप क्रिएशन्सचे निर्माता विनोद शिंदे यांनी मुंबईत शूटिंग न करता कल्याण परिसरातच शूटिंग सुरू केले आहे. यामध्ये स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ आदींना प्राधान्य दिले जात आहे. ‘डिटेक्टीव रागिनी’ या हिंदी वेबसिरीजच्या सिझन 2चे चित्रीकरण सध्या सुरू असून डिटेक्टीव रागिणीच्या प्रमुख भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकर काम करत आहेत.
लॉकडाऊननंतर स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न असल्याचे दिग्दर्शक विनोद शिंदे यांनी सांगितले. तर आमच्यासारख्या स्थानिक कलाकारांसाठी विनोंद शिंदे यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना प्रतिक्षा मुणगेकर हिने व्यक्त केली.
या वेबसिरीजमध्ये ज्येष्ठ अभिनेते विजय कदम, प्रणव रावराणे, वृषाली हटाळकर, भाविका निकम हेदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही वेबसिरीज रेड प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित केली जाणार असल्याची माहिती रेड प्राईम ऍपचे सीईओ संदीप राठोड यांनी दिली.