Home ठळक बातम्या विकासकामांवरील टिकेवरून शिवसेनेचा भाजप-मनसेवर पलटवार

विकासकामांवरील टिकेवरून शिवसेनेचा भाजप-मनसेवर पलटवार

 

कल्याण – डोंबिवली दि.27 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीची चर्चा जशी वाढत चालली आहे तसतसा इथल्या प्रमूख राजकीय पक्षांमधील शाब्दिक युद्ध तीव्र होताना दिसत आहे. विकासकामाच्या मुद्द्यांवरून भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर शिवसेनेनेही त्यांच्यावर पलटवार केला आहे.

भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी 471 कोटींच्या रस्त्यांवरून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. मात्र मुळातच या रस्त्यांना कोणत्याही प्रकारची तांत्रिक किंवा इतर स्वरूपाची मंजुरी मिळाली नव्हती असा दावा शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला. त्यांच्यामुळे डोंबिवलीची विकासकामे रखडल्याचे सांगत त्यांना दरवर्षी मिळालेला 20 कोटींचा आमदार निधी त्यांनी केवळ गटार पायवाटांमध्येच घालवल्याचा गंभीर आरोपही म्हात्रे यांनी यावेळी केला. तर विकासकामांबाबत चव्हाण यांनी डोंबिवलीकरांसमोर आपल्यासोबत थेट चर्चा करण्याचे आवाहनही दिपेश म्हात्रे यांनी दिले.
तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमआयडीसीतील रस्त्यांसाठी 110 कोटींचा निधी मंजूर केला आहे. हे रस्ते काय बाजारात विकत मिळत नसतात की रस्ते आणले आणि ठेवले अशी टिका दिपेश म्हात्रे यांनी यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर केली. तसेच येत्या काळामध्ये आम्ही या रस्त्यांची भूमीपूजने करू तेव्हा बॅनरऐवजी लोकांचे कपडे फाटतील असा टोलाही दिपेश म्हात्रे यांनी मनसेला लगावला.

दरम्यान केडीएमसी निवडणुकीची चर्चा सुरू झाली तशी दिवसागणिक राजकीय पक्षांमधील शह काटशहाचे राजकारण जोर धरू लागल्याचे दिसून येत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा