कल्याण दि.24 ऑगस्ट :
शिवसेना विरुद्ध भाजपचा संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसत असून कल्याणात शिवसेनेकडून भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करण्यासह भाजप पदाधिकाऱ्याला मारहाणही झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद कल्याणातही उमटलेले पाहायला मिळाले. कल्याणच्या देवी अहिल्याबाई होळकर चौकात असणाऱ्या भाजप कार्यालयाला शिवसेनेने लक्ष केले.
या कार्यालयावर शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक करत या कार्यालयाच्या काचा फोडल्या. तसेच यावेळी शिवसेनेला विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यालाही यावेळी मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि शिवसेनेचे महानगरप्रमूख विजय साळवी यांच्यासह शिवसेनेचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नारायण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून आमच्या पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्य आम्ही कधीही सहन करणार नाही. जोपर्यंत भाजप दिलगिरी व्यक्त करत नाही आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे माफी मागत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार विश्वनाथ भोईर आणि महानगर प्रमुख विजय साळवी यांनी दिली.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच भाजप पदाधिकारी कार्यालयाबाहेर जमले असून पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.