कल्याण दि.6 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या चर्चेला सुरुवात होताच राजकीय वातावरणही बदलण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार असले तरी कल्याण डोंबिवलीत मात्र त्यात केडीएमसी निवडणुकीच्या आधी फुट पडते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षातर्फे स्वबळाचा नारा देण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनीही शिवसेनेविरोधात दंड थोपटत काँग्रेसची री ओढली आहे. त्यातच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी डोंबिवलीत झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नगरसेवकांच्या पुन्हा घरवापसीचे संकेत दिले. त्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख दीपक काळे आणि त्यांच्या पंचवीस सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच राजकीय शिमगा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या उपस्थितीत आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कल्याण शहराध्यक्ष निखिल कदम यांच्या माध्यमातून हा पक्ष प्रवेश घेण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांच्या प्रेरणेने शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्या ताकदीने उभा राहील यात तिळमात्र शंका नसल्याचे शिखरे यांनी सांगितले.
यावेळी कल्याण डोंबिवली विद्यार्थी अध्यक्ष सुजित रोकडे, जिल्हा कॉर्डिनेटर सुजित पवार, जिल्हा सरचिटणीस जयेश भोईर, शहर सचिव तिजो क्रिश्चन आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
असेल त्यांच्या सोबत
नसेल त्यांच्या विना भगवा फडकणार च