डोंबिवली दि.6 ऑगस्ट :
डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्याच्या मंजूर निधीवरून शिवसेनेने कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर सडकून टिका केली आहे. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेली किती तरी विकासकामं जनता पहात असून आमदार राजू पाटील यांनी आपले किमान 1 विकासकाम दाखवण्याचे जाहीर आव्हानही शिवसेनेने दिले आहे. कल्याण – शिळ रस्त्याच्या पाहणीदरम्यान आमदार राजू पाटील यांनी आपण मंजूर केलेल्या रस्त्याचे श्रेय घेत असल्याचा आरोप केला होता. त्यावर शिवसेनेकडून आज पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन करण्यासह आमदार राजू पाटील यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवलेला पाहायला मिळाले.
यावेळी बोलताना शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमूख प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले की खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रस्त्यांसाठी 360 कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला आणि काही लोकांचा पोटशूळ उठला. त्यापैकी तब्बल 111 कोटी निधी हा कल्याण ग्रामीणमधील रस्त्यांसाठी मंजूर झालेला आहे.
त्याआधी डोंबिवली एमआयडीसीसाठी 110 कोटी, डोंबिवली शहरासाठी 5 कोटी तर पीडब्ल्यूडीकडून मानपाडा रोडसाठी 27 कोटी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंजूर करून आणले आहेत.
आज जरी या रस्त्यांची परिस्थिती बिकट असली तरी संपूर्ण वर्षभरात कायापालट होणार असल्याचा विश्वास प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केला. तर शिवसेना आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे श्रेयासाठी काम करत नाही. काम केल्यावर जनता आपोआप त्याचे श्रेय देते. त्यासाठी खासदारांना धडपड करायची आवश्यकता नाही.
विकासकामे तडीस नेण्यासाठी सकाळी लवकर उठावे लागते , संबंधित शासकीय विभागाकडे पाठपुरावा करावा लागतो. केवळ पत्र देऊन कामे होत नसल्याचा टोलाही म्हात्रे यांनी यावेळी लगावला. तर मानपाडा रोडसाठी पीडब्ल्यूडीने मंजूर केलेला 27 कोटींचा निधी केवळ आपल्या एकट्यामूळे आल्याचा आमदार राजू पाटील यांचा दावा खोटा असल्याचे सांगत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचाही त्यामध्ये मोठा पाठपुरावा असल्याचे यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले.
तर शिवसेनेचे ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आणि माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी सांगितले की कल्याण ग्रामीण मतदारसंघ शापित असल्याची चर्चा लोकं करतात. या मतदारसंघाला निष्क्रिय आमदार लाभल्याची टिका केली. तसेच राजू पाटील यांच्या पत्रामूळे नाही तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याएवढी दूरदृष्टी असणारा लोकप्रतिनिधी आपण आजपर्यंत बघितला नसल्याचे सांगत राजू पाटील यांनी काय काम केले आहे असा प्रश्न उपस्थित केला.
त्याचबरोबर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण तालुका प्रमूख प्रकाश म्हात्रे, माजी स्थायी समिती सभापती, रमेश म्हात्रे, दिपेश म्हात्रे यांच्यासह योगेश म्हात्रे, राजेश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.