48 लोकसभा आणि 288 विधानसभेच्या निवडणुक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर
कल्याण दि. ९ जून :
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने वेगाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 48 लोकसभा आणि 288 विधानसभेच्या निवडणूक प्रमुखांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामध्ये कल्याण लोकसभेच्या प्रमुखपदी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांची तर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात माजी आमदार नरेंद्र पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी आपापले पक्ष बळकट करण्यास सुरुवात केली आहे. त्यात सध्या भाजपने आघाडी घेतल्याचे दिसत असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील लोकसभा आणि विधानसभा प्रमुखांच्या नावाची नुकतीच घोषणा केली आहे.
त्यामध्ये विद्यमान जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांची कल्याण लोकसभा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. तर कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुखपदी माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण पूर्व विधानसभेमध्ये संजय मोरे, कल्याण ग्रामीणमध्ये विधानसभा नंदू परब, डोंबिवली विधानसभेत प्रज्ञेश प्रभुघाटे, अंबरनाथ विधानसभेत गुलाबराव करंजुले पाटील यांची विधानसभेच्या निवडणुक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कल्याण जिल्ह्यातील नेत्यांकडे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारला निवडून आणण्यासाठी पक्षबांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने ही जबाबदारी देण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या नव्या पदाधिकारी नियुक्त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.