कल्याण दि.1 ऑगस्ट :
कल्याण – मुरबाड मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांच्या मार्गातील विघ्नं काही केल्या संपायचे नाव घेत नाहीये. आधीच या मार्गावरील खड्ड्यांमुळे जीव नकोसा झालेला असताना आता शहाड उड्डाणपुलावर भले मोठे भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली असून पुलाच्या डागडुजीचे काम सुरू झाले आहे.(shahad-flyover-on-kalyan-murbad-road-damaged-ban-on-heavy-vehicles)
कल्याणहून मुरबाड- नगरकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गावरील शहाड उड्डाणपूल हा महत्त्वाचा दुवा आहे. येथील रेल्वे लाईनवर हा पूल बांधण्यात आला असून दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरील रस्त्याची अक्षरशः चाळण होते. यंदाही तेच चित्र दिसत असून त्यात आता थेट पुळलाच भगदाड पडल्याने या उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर या पुलाच्या स्लॅबलाही खालून तडे गेल्याचे फोटोमध्ये दिसून येत आहे.
आज सकाळच्या सुमारास हा प्रकार समोर आला असून खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करत कल्याणहून जाणारी वाहतूक गोवेली – टिटवाळा – कल्याण आणि रायते – दहागाव बदलापूरमार्गे वळवण्याची सूचना राष्ट्रीय महामार्गाचे ठाणे उपविभागाचे उपअभियंत्यांनी केली आहे. परिणामी पुढील आणखी काही दिवस खड्ड्यांसोबतच वाहतूक कोंडीचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.