कल्याण दि. 2 फेब्रुवारी :
कल्याण पश्चिमेच्या गांधारी पुल परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या रिंगरोडवरील अपघातांची मालिका काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये. काल रात्रीही (1 फेब्रुवारी 2023) या रिंगरोडवर भीषण अपघात झाला असून वारंवार होणारे हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कल्याण आणि डोंबिवलीतील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने रिंगरोड हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून या रत्याचे काम सुरू असून कल्याण परिसरातील रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. एका बाजूला शांतपणे वाहणाऱ्या नद्यांचा संगम, दुसरीकडे घनदाट झाडी, त्यासमोर नविन कल्याण अशी ओळखप्राप्त भागातील टोलेजंग इमारती. तर या सर्वांवर कळस म्हणजे हा अत्यंत सुटसुटीत आणि अतिशय गुळगुळीत असा रिंगरोड. या सर्व कारणांचा विचार केला असता अवघ्या काही महिन्यांत हा रस्ता आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी अक्षरशः गळ्यातला ताईत बनला आहे. दिवस असो की रात्र हा रिंगरोड नेहमीच लोकांच्या उपस्थितीत गजबजलेला दिसून येतो.
मॉर्निंग वॉकसाठी तर पहाटेपासूनच शेकडो नागरिकांची या ठिकाणाला पसंती मिळाली आहे. एवढेच नव्हे तर संध्याकाळीही याठिकाणी तर अक्षरशः जत्रा भरलेली असते. अनेक जण आपल्या मित्रमंडळी, कुटुंबासह या रिंगरोडवर फिरायला येत असतात. अतिशय गुळगुळीत रस्ते आणि याठिकाणी रस्त्यावर एकही स्पीड ब्रेकर नसल्याने याठिकाणी बाईक तसेच फोरव्हीलर चालकांचे लक्ष गेले नसते तर नवल. परंतू या रस्त्याचा हा स्ट्राँग पॉइंटच सध्या नागरिकांच्या दृष्टीने काहीसा अडचणीचा ठरत आहे. या मार्गावर एकही स्पीड ब्रेकर नसल्याने बाईकस्वार किंवा फोर व्हीलर चालक अतिशय भरधाव वेगाने आपापल्या गाड्या याठिकाणी चालवत असतात. त्यात तर काही जण तर इतक्या बेदरकारपणे गाड्या चालवत असतात की त्यांच्यासोबत ते इतरांचा जीवही धोक्यात टाकत असल्याचे त्यांच्या लक्षातच येत नाहीये.
परिणामी गेल्या काही महिन्यांत याठिकाणी अपघाताच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. काही आठवड्यांपूर्वी मराठी फिल्म इंडस्ट्रीत नावलौकिक मिळवलेल्या कल्याणातील एका कलाकाराच्या गाडीचाही भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये त्याची गाडी इतकी वेगात होती की अनेक कोलांटउड्या मारून ही गाडी रस्त्याच्या कडेचे पत्रे तोडून आतमध्ये घुसली होती. त्यापाठोपाठ काल रात्रीही या रिंगरोडवर एक भीषण अपघात झाला असून त्यात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
यासोबतच दररोज अनेक छोटे मोठे अपघात या रस्त्यावर होत आहेत. सुदैवाने इतके दिवस तरी हे अपघात कोणाच्या जीवावर उठलेले नव्हते. मात्र काल रात्री एका तरुणीच्या मृत्यूनंतर या अपघाताच्या मालिका वेळीच रोखण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने हे वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वाहन चालकांनी भरधाव वेगाने गाड्या चालवू नये – एस. एस. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकपाडा पोलीस स्टेशन
हा रस्ता मोकळा असल्याने तसेच याठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने अनेक वाहन चालक भरधाव वेगाने गाड्या चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र त्यामूळे स्वतःच्या आणि त्या रस्त्यावर असलेल्या नागरिकांच्या जिविताच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब असून भरधाव वेगात वाहने न चालवण्याचे आवाहन खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एस. पाटील यांनी केले आहे.
महाविद्यालयीन युवकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत सतत जनजागृती – महेश तरडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा
महाविद्यालयीन युवकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत आमच्याकडून सतत जनजागृती केली जात आहे. नुकत्याच झालेल्या रस्ते सुरक्षा अभियानातही आम्ही शहरातील प्रत्येक कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. तर दुसरीकडे बेदरकार पणे गाडी चालवणाऱ्या व्यक्तींविरोधात आमची कायदेशीर कारवाईही सुरू असल्याची प्रतिक्रिया शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे.