कल्याण डोंबिवली दि.18 मार्च :
महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने काल घेतलेल्या असाक्षरांच्या प्रथम चाचणी परीक्षेला कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोठा प्रतिसाद मिळाला. इतर वयोगटातील नागरिकांसोबतच विशेष म्हणजे तब्बल 81 वर्षांच्या आजीबाईंनीही यात सहभागी होत सर्वांची मनं जिंकली.
महाराष्ट्र शालेय शिक्षण (योजना)विभागाने केडीएमसी क्षेत्रात नुकतेच सर्वेक्षण केले. त्यामध्ये ऑनलाईन नोंदणी केलेल्या 801 असाक्षरांची प्रथम चाचणी रविवारी 17 मार्च रोजी घेण्यात आली. केडीएमसी शिक्षण विभागामार्फत या परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. केंद्र शासनाने २०२२ ते २०२७ या काळासाठी नवभारत साक्षरता योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून १५ वर्षे आणि त्याहून अधिक म्हणजे ३५ वर्षापर्यंतच्या निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता म्हणजे वाचन, लेखन, संख्याज्ञान, महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य विकसित करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या वयोगटातील शिकाऊ व्यक्तींना मुलभूत शिक्षण देणे., त्याअंतर्गत समतुल्य पूर्वतयारी स्तर अर्थात इयत्ता ३ री ते ५ वी, मध्यस्तर इयत्ता ६ वी ते १० वी आणि माध्यमिक स्तर इयत्ता ९ वी ते १२वी अशा प्रकारचे शिक्षण दिले जाणार आहे.
केडीएमसी क्षेत्रात ऑनलाईन नोंदणी झालेल्या 801 पैकी 627 असाक्षरांची प्रथम चाचणी काल संपन्न झाली. केडीएमसी क्षेत्रातील 82 परिक्षा केंद्रावर काल सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत ही परीक्षा घेण्यात आली.
81 वर्षांच्या आजींनी जिंकली मने…
या असक्षारांच्या प्रथम चाचणी परीक्षेत आईपासून आजीपर्यंत आणि बाबांपासून मामापर्यंत अशा वेगवेगळ्या वयाचे अनेक जण सहभागी झाले होते. मात्र मांडा येथील परीक्षा केंद्रावर आलेल्या तब्बल 81 वर्षांच्या आजीबाई या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या आजीबाईंनी कोणतीही लाज न बाळगता या परीक्षेत सहभागी होत शिक्षणाला वयाची अट नसते हे वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित केले.
या परिक्षेसंदर्भात शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी रंजना राव, शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांच्या आदेश आणि सुचनेनुसार या परिक्षा चांगल्या आणि शिस्तबद्ध वातावरणात होण्यासाठी अधिकाऱी , कर्मचारी (SSA) सर्व सीआरसी प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक या सर्वांचे मार्गदर्शन सहकार्य लाभले. तर शिक्षण विभाग अधिकारी लक्ष्मण जाधव, नोडल अधिकारी चंद्रमणी सरदार, विषयतज्ञ तसेच तंत्रस्नेही शिक्षक श्विलास लिखार सर यांनी कामकाज पाहिले.