भाजप पदाधिकारी माळीविरोधात राष्ट्रवादीतर्फे धरणे आंदोलन
डोंबिवली दि.४ ऑक्टोबर :
कधी काळी जो सर्वात मागासलेला परिसर होता तो कळवा मुंब्रा मतदारसंघ डोंबिवलीपेक्षा लाख पटीने बरा असून इथल्या उच्चशिक्षीत, सुसंस्कृत मतदारांच्या सहनशीलतेला आपला सलाम असल्याची शालजोडीतील बोचरी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप पदाधिकारी संदीप माळी याच्याविरोधात डोंबिवली पूर्वेला धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आव्हाड यांनी ही टिका केली. या आंदोलनाला डोंबिवली शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
इकडे कायद्याचे राज्य आहे की नाही…?
एकीकडे आमच्या कार्यकर्त्यांवर लहान सहान गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना तडीपारीची नोटीस दिली जाते आणि इकडे भाजप पदाधिकारी संदीप माळीवर २२ गुन्हे दाखल असूनही तो मोकळा फिरतो, इकडे कायद्याचे राज्य आहे की नाही असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला. तर हिटलरने ज्याप्रमाणे स्वतःची आर्मी स्थापन केली होती तसाच प्रकार आपल्याला ठाण्यामध्ये होताना दिसत असल्याचे सांगत राजकीय दहशत पोलिसांच्या मार्फत तयार केली जात असल्याचा गंभीर आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला.
दसरा मेळाव्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही…
तर शिवाजी पार्क शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबंध आणि संदर्भ नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. शिवाजी पार्क, शिवतीर्थ, शिवसेना आणि दसरा मेळावा हे गेल्या कित्येक वर्षांपासूनचे समीकरण तयार झाले आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा देणारे बॅनर लावले याचा अर्थ आमचाही त्यात सहभाग असेल असा होत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
डोंबिवलीकरांच्या मतदानाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह…
तर डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत बोलताना आव्हाड यांनी इथल्या डोंबिवलीच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विशेषणांचा दाखल देत त्यांनी इथल्या मतदारांच्या सहनशीलतेवर शालजोडीतून अत्यंत बोचरी टिका केली. सांस्कृतिक शहर, विद्येचे माहेरघर, उच्च विद्यावभूषितांची, साहित्यिकांची नगरी अशी ओळख असणाऱ्या डोंबिवलीकरांच्या मतदानाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या धरणे आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, प्रवक्ते महेश तपासे, माजी खासदार आनंद परांजपे, कार्याध्यक्ष वंडार पाटील यांच्यासह, शहराध्यक्ष सुरेश जोशी, शिवसेनेचे सदानंद थरवळ, काँग्रेसचे संतोष केणे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सारिका गायकवाड आदी पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.