कल्याण दि.2 जून :
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याला दिमाखात प्रारंभ झाला असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही त्याचा नादघोष उमटताना दिसत आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक कल्याण शहरातही शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मंत्रोच्चारात मानवंदना देण्यात आली. (350th Shiv Rajyabhishek Day: Salute to Chhatrapati Shivraya by the entire Hindu community even in Kalyan)
कल्याण पश्चिमेतील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने सहजीवन सेवा संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एकीकडे पारंपरिक मंत्रोच्चार आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष. अशा भारावलेल्या वातावरणात शिवप्रेमींनी छ्त्रपती शिवरायांना मानवंदना दिल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी उपस्थित महिला शिवप्रेमींकडून महाराजांना ओवाळत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
महाराष्ट्राला परकीयांच्या अतिक्रमणातून मुक्त करीत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छ्त्रपती शिवराय आजच्या तिथीला सिंहासनाधिष्ठीत झाले. त्याचे औचित्य साधून हिंदू समाजात जागृती आणि एकत्रित होण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती सहजीवन सेवा संस्थेचे प्रमुख मधू काका फडके यांनी दिली.
तर छ्त्रपती शिवरायांना आजच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन करण्यासह आपल्या सर्वांच्या मनामध्ये महाराजांविषयीचे प्रेम अधिक वृध्दिंगत करणे हा आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.
या कार्यक्रमाला कल्याण शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.