यंदाच्या ऑक्टोबरमध्येही विजेची विक्रमी मागणी
कल्याण दि.20 ऑक्टोबर :
ऑक्टोबर हिटमुळे महाराष्ट्रात काल विजेची तब्बल 25 हजार मेगवॉटपेक्षा अधिक मागणी नोंदवली गेली. राज्याची वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला तब्बल 9 हजार 900 मेगावॉट वीज बाहेरून विकत घ्यावी लागली. या पार्श्वभमीवर केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाशिवाय राज्याला पर्याय नसल्याचे यातून अधोरेखित झाले आहे. (Rising power demand: MMR has no option but the Mumbai Urja Marg transmission project)
विजेची मागणी दरवर्षागणिक वाढती मात्र…
आकडेवारीवर नजर टाकल्यास असे लक्षात येईल की राज्यामध्ये साधारणपणे 22 हजार मेगावॉट मागणी नोंदवली जाते. मात्र यावर्षी वीज मागणीने आधी 24 हजार मेगावॉट आणि काल तर थेट 25 हजार 209 मेगावॉटचा टप्पा ओलांडला. यंदाच्या उन्हाळ्यातील एप्रिल महिन्यात हीच वीज मागणी 25 हजार 438 मेगावॉट पर्यंत पोहोचली होती. तर मुंबईचा विचार केला असता दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात 3300 ते 3500 मेगावॉट विजेची गरज भासते. परंतु यंदा त्यातही वाढ होऊन विजेच्या मागणीने 3 हजार 895 चा टप्पा ओलांडला आहे. त्यामूळे या वाढत्या वीज मागणीला पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे बनले आहे.
मुंबई ऊर्जा मार्ग ट्रान्समिशन प्रकल्पाची का आहे गरज…?
मुंबई आणि आसपासच्या एमएमआर रिजन परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या तब्बल 40 वर्षे जुन्या झाल्या आहेत. त्यांची वीज वहन करण्याची क्षमता कधीच संपुष्टात आली असून त्यांना पर्यायी कोणतीही यंत्रणा सध्या तरी उपलब्ध नाही. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईचा बहुतांश भाग अंधारात बुडाला होता. यावरूनच नवीन पर्यायी वीज वहन यंत्रणा किती गरजेची आहे हे अधोरेखित होते. दरवर्षागणिक मुंबई आणि एमएमआर परिसराची वीज मागणी वाढतच जाणार यात कोणताही संशय नाही. परंतु त्यासाठी तितकीच सक्षम वीज वाहन यंत्रणा उपलब्ध असली पाहिजे.ज्यामुळे विद्यमान मागणी पूर्ण होण्यासह भविष्याची गरजही भागू शकेल.
काय आहे मुंबई ऊर्जा मार्ग ट्रान्समिशन प्रकल्प…
गेल्या दशकभरात मुंबईसोबतच त्याच्या आसपासच्या महानगर परिसरामध्ये (MMR Region) पायाभूत सुविधांचा अत्यंत वेगाने विकास होतोय. परिणामी या भागामध्ये औद्योगिक आणि रहिवासी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रचंड अशी वाढ झाल्याने विजेची मोठी मागणी पाहायला मिळत आहे. वाढता वीज वापर लक्षात घेता अशावेळी याठिकाणी अखंडित वीज उपलब्ध असणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखूनच केंद्र सरकारने ऊर्जा मंत्रालयातर्फे मुंबई ऊर्जा मार्ग हा आंतरराज्य महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. ज्याच्या माध्यमातून येत्या काळात मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये अखंड वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे.
आंतरराज्य ट्रान्समिशन नेटवर्कची (ISTS) उभारणी…
मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या माध्यमातून अखंड वीज पुरवठ्यासाठी एक आंतरराज्य ट्रान्समिशन नेटवर्कची (ISTS) उभारणी केली जात आहे. ज्यामुळे मुंबई आणि एमएमआर रिजनसाठी तब्बल २ हजार मेगावॉट अतिरिक्त वीज पुरवठा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यासोबतच या भागासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या वीज पुरवठ्याच्या ट्रान्समिशन नेटवर्कलाही बळ देण्याचे काम या महत्वाकांक्षी प्रकल्पातून केले जाणार आहे.
या सर्व गोष्टींचा आणि भविष्याचा विचार करता मुंबई ऊर्जा मार्ग ट्रान्समिशन प्रकल्पाशिवाय मुंबई आणि एमएमआर रिजनला दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याचे मत ऊर्जा क्षेत्रातील तज्ञ आणि जाणकार व्यक्तींकडून व्यक्त करण्यात आले आहे.