कल्याण दि.13 मार्च :
आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासकीय यंत्रणा सज्ज होऊ लागल्या असून निवडणूक विभागानंतर सर्वात महत्त्वाचा विभाग असलेल्या पोलीस प्रशासनानेही त्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कल्याण पश्चिमेत दंगल नियंत्रण पथकामार्फत रंगीत तालीम करण्यात आली.
निवडणुका म्हटलं की प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय आव्हानात्मक काळ समजला जातो. कोणतीही गडबड गोंधळ न होता या निवडणुका पार पडावी अशी प्रशासनाची भूमिका असते. या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ 3 मध्ये गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून विविध माध्यमातून आपली सज्जता दर्शवण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात पोलिसांनी कल्याण पूर्व आणि पश्चिमेत अतिशय तगडा असा रूटमार्च काढत त्यातून समाजकंटकांना आवश्यक तो संदेश दिला. त्यापाठोपाठ आज कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी परिसरामध्ये पोलिसांकडून दंगल नियंत्रणाची रंगीत तालीम करण्यात आली. कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांच्या अंतर्गत येणाऱ्या बाजारपेठ, महात्मा फुले, खडकपाडा आणि कोळसेवाडी या पोलीस ठाण्यातील अधिकारी – कर्मचारी सहभागी झाले होते.
यामध्ये कायदा – सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास ती कशाप्रकारे हाताळावी, जमावावर कसे नियंत्रण मिळवावे आणि पुन्हा कायदा सुव्यवस्था कशी निर्माण करावी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.