नवी दिल्ली दि.5 एप्रिल:
देशात ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि विद्यार्थ्यांसह अनेक समूहांना भारतीय रेल्वे प्रशासनाकडून दिली जाणारी प्रवास भाड्यातील सवलत २०२० वर्षात करोना काळापासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना पूर्ण भाडे द्यावे लागत असून यात निवृत्त झालेल्या आणि वेतन नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा आकडा अधिक आहे. त्यांना तात्काळ दिलासा देण्याची गरज देण्यासाठी ही सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी शून्य प्रहरात देशातील लाखो रेल्वे प्रवाशांचा प्रश्न उपस्थित केला. भारतीय रेल्वेकडून रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांसह ५३ विविध समूहाच्या प्रवाशांना प्रवासी भाड्यात सूट दिली जात होती. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, विद्यार्थी अशा विविध घटकांचा समावेश होता. यात महिला प्रवाशांना ५० टक्के तर पुरुष प्रवाशांना ४० टक्के तिकिटात सवलत दिली जात होती. मात्र २०२० वर्षात करोनाच्या संकटात ही सूट देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, खेळाडू विद्यार्थी आणि इतर विविध गटातील प्रवाशांना पूर्ण भाडे द्यावे लागते आहे.
याबाबत सभागृहात बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एका माहिती अधिकाराचा दाखला दिला. गेल्या 2 वर्षांत तब्बल 4 कोटी ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वे प्रवासासाठी पूर्ण भाडे दिले आहे. ही सर्व संख्या निवृत्त आणि कोणतेही उत्पन्न नसणाऱ्या नागरिकांची असून सध्या केवळ १५ गटातील प्रवाशांना सवलत दिली जाते आहे. मात्र ही सवलत सर्व ५३ गटांना पूर्वीप्रमाणे देण्याची गरज आहे. देशात २०११ च्या जनगणानेनुसार ज्येष्ठ नागरिकांची संख्या ११ कोटी असून येत्या २०२६ पर्यंत ही संख्या १७ कोटी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी ही भाडे सवलत पुन्हा देण्याची आग्रही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली.