
कल्याण दि.22 जुलै :
महाराष्ट्राच्या विधानभवनाची हुबेहूब साकारण्यात आलेला गुलाबाचा बुके कल्याण पूर्वेत चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. निमित्त आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील माजी अभ्यासू नगरसेवक निलेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आलेला हा अनोखा बुके सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
साधारणपणे दिड महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुक संपन्न झाली. आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष हे अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. राज्यांतील सत्ताधारी महायुती असो की महाविकास आघाडी, या सर्वांनीच हळूहळू विधानसभेच्या दृष्टीने कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेतील नागरिकांनी निलेश शिंदे यांना हा विधानसभेच्या प्रतिकृतीचा बुके दिला आहे.
अनेक गुलाबांनी भरगच्च असलेला या बुकेवर विधानभवनाची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. तसेच त्यावर ” कल्याण पूर्वेतील जनतेच्या मनात…निलेश दादा विधानभवनात ” अशा आशयाचा संदेशही लिहिण्यात आला आहे. ज्यातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकप्रकारे माजी नगरसेवक निलेश शिंदे यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे माजी नगरसेवक निलेश शिंदे, यांना देण्यात आलेल्या या अनोख्या बुकेमुळे त्यापाठोपाठ कल्याण पूर्व पुन्हा एकदा राजकीय पटलावर चर्चेत आले आहे. ज्याचे विधानसभा निवडणुकीचे राजकीय चित्रही लवकरच स्पष्ट होईल.