महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांचाही घेतला आढावा
कल्याण दि.13 ऑगस्ट :
केडीएमसी क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष विकासकामांबाबत आणि महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांबाबात कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज मॅरेथॉन बैठक घेतली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये खा. डॉ.शिंदे यांनी विकासकामांची गती वाढवण्याचे निर्देशही उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील, राजेश मोरे, युवासेना सचिव दिपेश म्हात्रे, महेश गायकवाड, महेश पाटील यांच्यासह केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Regarding overall development works in KDMC area. Dr. Shrikant Shinde’s marathon meeting)
लोकसभा निवडणुकीपूर्वी कल्याण डोंबिवलीतील विविध विकास प्रकल्पांबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर आज ही मॅरेथॉन आढावा बैठक संपन्न झाली. ज्यामध्ये 27 गावांतील अमृत योजना, एमएमआरडीए’च्या माध्यमातून सुरू असणारी रस्त्यांची कामे, गटारांची कामे, नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे, महापालिका शाळांचे सुशोभीकरण आणि अद्ययावतीकरण, स्मशानभूमिंचे अद्ययावतीकरण, शहरातील उद्याने आणि तलावांचे पुनरुज्जीवन – विकास आदी महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
त्यासोबतच नामांकित केपीएमजी ही संस्था पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवर शहरामध्ये स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट टॉयलेट्स आणि ॲड स्पेस डेव्हलपमेंटचे काम करणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेला या संस्थेला यासाठी एक रुपयाही द्यावा लागणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तर कल्याण पूर्वमध्ये 100 फुटी रस्ता परिसरात असलेल्या 8 एकर जागेवर स्टेडियम उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी 60 टक्के भूसंपादन झाले असून डोंबिवलीतील वै.संत श्री सावळाराम महाराज क्रिडा संकुलाच्या धर्तीवर हे स्टेडियम उभारण्याचा मानस असल्याचे सांगत याचसोबत डोंबिवलितील खंबाळ पाडा , कल्याण पश्चिमेतील बारावे येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे स्पोर्ट्स स्टेडियम उभारण्याबाबतचे प्रेझेंटेशनही आजच्या बैठकीत करण्यात आल्याचे खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
तर मेट्रो 12 चे काम पूर्णपणे गतीने सुरू असल्याचे सांगत सावळाराम क्रिडा संकुल जुने झाल्याने त्याचा पुनर्विकास आणि अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या कामासाठी एमआयडीसीकडून 50 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे.
कल्याण पश्चिमेच्या मेट्रोलाही लवकरच सुरुवात…
कल्याण पश्चिमेसाठी मंजूर झालेल्या मेट्रो 5 च्या आधीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पूर्वी ही मेट्रो दुर्गाडी – सहजानंद चौकातून जाणार होती. मात्र आता नव्या मागणीनुसार दुर्गाडी – खडकपाडा मार्गाला मंजुरी देण्यात आली असून त्याचा डी पी आरचे कामही आता पूर्ण झाले आहे. त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल असा विश्वास व्यक्त करत त्यामुळे पूर्ण कल्याण पश्चिम मेट्रो मार्गाने जोडले जाईल असे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.