
ब आणि ई या दोन वार्डमध्येच अडीचशे कोटी कर जमा
कल्याण डोंबिवली दि.2 एप्रिल :
कोवीड काळापासून काहीशा आर्थिक गर्तेत सापडलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेला करदात्यांनी एकदम टेन्शन फ्री केलं आहे. यंदाच्या वर्षी केडीएमसीच्या तिजोरीत कधी नव्हे इतकी रक्कम मालमत्ता कराच्या रूपाने जमा झाली असून आधीचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. 31 मार्च 2024 पर्यंत केडीएमसीकडे तब्बल 622 कोटींहून अधिक कर नागरिकांनी भरला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेची 1 ऑक्टोबर 1982 रोजी स्थापना झाली. मात्र स्थापनेपासून आजतागायत गेल्या 42 वर्षांत इतक्या मोठ्या संख्येने कधी करवसुली झाली नव्हती. अपवाद केवळ 2020-21 या कोवीड कालावधीचा. कोवीड काळ असतानाही महापालिकेच्या इतिहासात त्यावेळी पहिल्यांदाच 400 कोटींचा टप्पा पार केला. परंतु यंदाच्या वर्षी तर या कर वसुलीने त्याचा रेकॉर्ड ब्रेक करत त्याही पुढचा 600 कोटींचा टप्पा गाठला आहे.
दोन वॉर्डमध्येच झालीय 240 कोटींपेक्षा जास्त वसुली…
केडीएमसीने यावर्षी आपल्या दहा प्रभागात मिळून तब्बल 622 कोटींपेक्षा अधिकची करवसुली केली आहे. या रेकॉर्ड ब्रेक वसुलीत केडीएमसीच्या ब आणि ई या दोन प्रभाग क्षेत्रांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. या दोन्ही वॉर्डांनी मिळून 240 कोटींची भर घातल्याचे एकंदर आकडेवारीवरून दिसून येत आहे. तर 622 कोटींच्या मालमत्ता करासोबतच पाणीपट्टीचीही 74 कोटी 72 लाखांची रक्कम केडीएमसीच्या तिजोरीत जमा झाली असल्याची माहिती मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे – कुलकर्णी यांच्याकडून देण्यात आली.
त्यामुळे केडीएमसी क्षेत्रातील विकासकामांसाठी मोठ्या संख्येने निधी उपलब्ध झाल्याची भावना केडीएमसी प्रशासनात व्यक्त होत आहे. तर ज्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी प्रामाणिकपणे करभरणा करून केडीएमसी प्रशासनाला सहकार्य केले आहे, त्यानुसार केडीएमसीनेही नागरिकांसाठी अधिकाधिक चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
प्रभाग क्षेत्रनिहाय झालेला करभरणा…
A वॉर्ड – 87 कोटी 91 लाख
B वॉर्ड – 112 कोटी 66 लाख
C वॉर्ड – 61 कोटी 34 लाख
D वॉर्ड – 35 कोटी 54 लाख
E वॉर्ड – 128 कोटी 99 लाख
F वॉर्ड – 33 कोटी 52 लाख
G वॉर्ड – 28 कोटी 66 लाख
H वॉर्ड – 47 कोटी 39 लाख
I वॉर्ड – 54 कोटी 65 लाख
J वॉर्ड – 28 कोटी 18 लाख
आणि 3 कोटी हस्तांतरण कर