डोंबिवली भाजपच्या असहकाराच्या पावित्र्यासंदर्भात मांडली भूमिका
डोंबिवली दि.१० जून :
पोलीस अधिकाऱ्याच्या मुद्द्यावरून डोंबिवलीत शिवसेना भाजप युतीमध्ये कटुता निर्माण झाली आहे. मात्र ही युती टिकवण्यासाठी प्रसंगी आपल्या खासदारकीच्या पदाचा राजीनामा देण्यास आपण तयार असल्याची भूमिका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली आहे.
दोन दिवसांपूर्वी कल्याण पुर्वेत झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पोलीस अधिकाऱ्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मदत न करण्याचा ठराव केला. त्यामूळे कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यानाच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा निर्धार आहे. तसेच केंद्रात पुन्हा शिवसेना भाजप युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हे आमचे ध्येय आहे. परंतु आपल्यामुळे युतीमध्ये विघ्न निर्माण होत असल्यास आपण खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याची भूमिका डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली आहे.
काही शुल्लक कारणांसाठी शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नका. येत्या लोकसभेच्या निवडणूकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेना भाजप युतीचे वरिष्ठ नेते घेतील. आपल्याला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल त्याचा एकदिलाने आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू असेही खासदार डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.