वाचन संस्कृती जोपासण्यासाठी कल्याणातील कदम कुटुंबियांच्या प्रयत्नांना मिळतेय यश
कल्याण दि.13 ऑक्टोबर :
मोबाईलचा अतिरेकी वापर कमी करण्यासह लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्याच्या मूळ उद्देशाने कल्याणात सुरू झालेल्या ” वाचक कट्ट्या”ने यशस्वीपणे दोन वर्षे पूर्ण केली आहेत. कल्याणातील विशाल कदम आणि त्यांच्या कुटुंबियांनी मिळून दोन वर्षांपूर्वी या “सार्वजनिक वाचन संस्कृती”चे बीजारोपण केले होते. ज्याला कल्याणातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. (Readers in Kalyan completed 2 years; The love of reading is rooted in senior citizens from childhood)
साधारणपणे दोन दशकांपूर्वी टीव्हीने आणि गेल्या दशकभरात मोबाईलने आपल्या मनाचा ताबा घेतला आहे. त्यातही मोबाईलमुळे तर केवळ मनाचा ताबाच नाहीतर मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत. लहानगे असो की मोठी मंडळी अशा सर्वच स्तरांतून मोबाईलचा अतिरेकी वापर वाढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर समाजातून कमी होत जाणारी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी कल्याणातील विशाल कदम कुटुंबियांनी दोन वर्षांपूर्वी वाचक कट्टा नावाची अभिनव संकल्पना राबवली. ज्यामध्ये मोबाईलचा वापर कमी करण्यासह लोकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी या संपूर्ण कदम कुटुंबियांनी सार्वजनिक ठिकाणी सामूहिक वाचनाचा प्रयोग केला.
या अनोख्या प्रयोगाला आजच्या दिवशी दोन वर्षे पूर्ण झाली असून त्यामध्ये केवळ कल्याणकर वाचकच नव्हे तर सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवली, कर्जत आणि थेट मुंबईतील काही वाचनप्रेमीही सहभागी होत असल्याची माहिती या उपक्रमाचे संस्थापक विशाल कदम यांनी एलएनएनशी बोलताना दिली. यामध्ये 5 वर्षांच्या लहान मुलांपासून 60-65 वर्षांचे ज्येष्ठ नागरिकांसोबतच नामांकित प्रकाशन संस्थाही आमच्याशी जोडल्या गेल्याचे ते म्हणाले. तर या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही लहान मुलांमधील मोबाईलचे वेड आम्ही वाचनाकडे वळवले आहे हा सर्वात जास्त आनंददायी अनुभव असल्याचेही विशाल कदम यांनी सांगितले.