खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला वाहतूक प्रकल्पांचा आढावा
कल्याण – डोंबिवली दि.8 जून :
कल्याण लोकसभा मतदारसंघाला जोडणारे महामार्ग, राज्यमार्ग आणि महत्वाचे रस्ते यांच्यात संलग्नता येऊन वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी नुकतीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मुख्यालयात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत कल्याण रिंग रोड, काटई ऐरोली उन्नत मार्ग, तळोजा खोणी ते जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार रस्ता, शिळफाटा उड्डाणपूल यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प तसेच उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरातील वाहतूक व्यवस्था बळकट करणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
विविध पायाभूत प्रकल्पांना गेल्या काही वर्षात मंजुरी…
कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा, मुंब्रा, कळवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरांना विविध मार्गांनी जोडून येथील वाहतूक विना अडथळा होण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी विविध प्रकल्पांना गेल्या काही वर्षात त्यांनी मंजुरी मिळवली आहे. या सर्व प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आणि या प्रकल्पांना संलग्नता मिळवून देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मुख्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते.
कल्याण रिंग रोडच्या कामाचा आढावा…
या बैठकीत कल्याण रिंग रोडच्या कामाचा आढावा घेण्यात आला. कल्याण रिंग रोड प्रकल्पातील टप्पा 3 मधील ८७ टक्के जमिनीचे भूसंपादन झाले असून त्याचा प्रत्यक्ष ताबा कल्याण डोंबिवली महापालिका लवकरच एमएमआरडीएला देईल. या टप्प्याची निविदा लवकरच जाहीर केली जाणार असून या प्रकल्पातील इतर टप्प्यातील अतिक्रमण, अडथळे आणि संबंधित प्रश्न तातडीने सोडवून प्रकल्प मार्गी लावा अशा सूचनाही खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या. या रिंगरोड प्रकल्पातील टप्पा आठमध्ये ६५० मीटर रस्ता तयार करून तो कल्याण आग्रा महामार्गाला जोडला जाईल. त्यासाठी ५५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याच्याही कामाला गती देण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. कल्याण रिंग रोड प्रकल्पातील टप्पा 2 साठी १४४ कोटी खर्च येणार असून त्याचे आरेखन तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या.
डोंबिवली स्टेशन परिसरात SATIS प्रकल्पाचा अभ्यास करा…
डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी येथे SATIS प्रकल्पाचा अभ्यास करावा अशा सूचना यावेळी डॉ. शिंदे यांनी दिल्या. तर अंबरनाथ SATIS प्रकल्पाला गती देण्यासाठी आवश्यक पाऊले उचलावीत अशा सूचना यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केल्या. या प्रकल्पासाठी यापूर्वीच निधी मंजूर करण्यात आला आहे. तर शहरातील दोन रेल्वे पुलांच्या बाबतीत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधला जाणार आहे.
नवी मुंबई, ठण्याशी जोडली जाणार शहरे…
ऐरोली – कटाई उन्नत मार्ग महत्वाकांक्षी असून त्याच्या उभारणीनंतर नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरे एकमेकांना जलदगतीने जोडली जाणार आहेत. या प्रकल्पातील तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी निविदा जाहीर करण्यात असेल असून हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलावीत अशा सूचना डॉ. शिंदे यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दिल्या. शिळफाटा येथील उड्डाणपुलाचे काम वेगाने मार्गी लावावे असेही डॉ. शिंदे यांनी बैठकीत सांगितले.
उन्नत मार्गाच्या कामाचा प्रकल्प आराखडा तयार करण्याच्या सूचना…
कल्याण मुरबाड महामार्ग आणि उल्हासनगरातून जाणाऱ्या जुना पुणे लिंक मार्गाला जोडणारा आणि कल्याण शहराच्या एका टोकाला दुसऱ्या टोकाशी तसेच उल्हासनगर या शहराशी जोडणाऱ्या उन्नत मार्गाच्या कामाचा प्रकल्प आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी दिल्या. यावेळी जागेची पाहणी करून या मार्गासाठी कमीत कमी अडथळे असलेले आरेखन केले जावे असेही डॉ. शिंदे यांनी सूचवले.
कल्याण शहरात यु टाईप प्रकारातील रस्त्यांची उभारणी…
कल्याण शहरात यु टाईप प्रकारातील रस्त्यांची उभारणी केली जाणार असून त्यासाठी ७३ कोटींची मंजुरी देण्यात आली. त्या मार्गांना गती देण्याबाबत पाऊले उचलण्याचे त्यांनी सूचवले. चक्कीनाका ते नेवाळी – मलंगगड मार्गासाठी ११ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली. काटई बदलापूर राज्यमार्गावर नेवाळी चौकातील कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल आवश्यक असून त्यालाही यावेळी मंजुरी देण्यात आली.
म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघात वाहतूक होणार वेगवान…
उल्हासनगर आणि अंबरनाथ शहराच्या पाले गावाला जोडण्यासाठी आवश्यक रस्त्याच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी यापूर्वीच २२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व कामांमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील महामार्ग, राज्यमार्ग, अंतर्गत रस्ते यांना जोडले जाणार असून त्यामुळे वाहतूक आणखी वेगवान आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
यावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगर उप जिल्हाप्रमख अरुण अशान महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड, विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजीज शेख, अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ आणि एमएमआरडीएचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.