कल्याण दि.22 ऑगस्ट :
एकीकडे आज घराघरात बहीण – भावाकडून रक्षाबंधनाचा सण साजरा होत असताना कल्याणच्या आदिवासी वस्तीत मात्र अनोख्या पध्दतीने हा सण साजरा झालेला पाहायला मिळाला. “अनुबंध” संस्थेच्या माध्यमातून कल्याणच्या सापर्डे येथील पाणबुडे नगर आदिवासी वाडीतील महिला, मुलं आणि मुलींनी झाडांनाराख्या बांधत पर्यावरण रक्षणचा संदेश दिला.
कल्याणच्या या पाणबुडे नगर आदिवासी वस्तीतील मुलांनी नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध प्रकारची झाडं लावून त्यांचे पालकत्व स्विकारले आहे. आपल्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे ही आदिवासी मुलं या झाडांचा सांभाळ करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आजचा रक्षाबंधनाचा हा सण या आदिवासी बांधवांनी या झाडांसोबत साजरा केला. ज्याप्रमाणे बहीण आपल्या भाऊरायाला ओवाळते आणि मग राखी बांधते अगदी त्याचप्रमाणे या आदिवासी महिला आणि मुलांनी झाडांना ओवाळून राख्या बांधल्याचे दिसून आले. बहीण -भावाच्या या नात्याबरोबरच आज पर्यावरणाचे रक्षण करणे हीदेखील काळाची गरज बनली आहे. पर्यावरणासोबत सामाजिक रक्षणाची जबाबदारीही आपलीच असून आजच्या निमित्ताने त्याचा स्विकार केल्याचे या आदिवासी बांधवांनी सांगितले.
तर आजचा सण हा राखी बांधण्यापुरता सिमित न राहता मुलींचे शिक्षण, त्यांची सुरक्षितता, लहान वयातील विवाह, मारझोड या सर्वांपासूनही त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे अनुबंध संस्थेच्या विशाल जाधव यांनी सांगितले.
हा अनोखा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत कोळी, विशाल कुंटे, बाळा शिंदे, वैभव देशमुख, नचिकेत कुलकर्णी (माणगाव), प्रभाकर घुले, राहुल साबळे यांच्यासह वस्तीतील इतर सर्व जण उपस्थित होते.