पाऊण तासानंतर वाहतूक झाली सुरू
दिवा दि.1 ऑक्टोबर :
बराच वेळ उलटूनही कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या न आल्याने संतप्त प्रवाशांनी दिवा रेल्वे स्थानकात आंदोलन केले. या संतप्त प्रवाशांनी थेट ट्रॅकवर उतरून तब्बल 40 मिनिटे रेल्वेची वाहतूक रोखून धरली. अखेर रेल्वे पोलिसांनी कशीबशी या प्रवाशांची समजूत काढल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू झाली.
पनवेल आणि कळंबोलीदरम्यान शनिवारी दुपारी मालगाडीचे डबे घसरल्याचा परिणाम कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवर झाला. कोकणात जाणाऱ्या काही गाड्या उशिराने धावत होत्या तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या.
दरम्यान कोकणात जाण्यासाठी दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांची आज मोठी गर्दी झाली होती. बराच वेळ उलटूनही कोकणात जाणारी रेल्वेगाडी न आल्याने या प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला. आणि त्यांनी थेट ट्रॅकवर उतरत रेल्वे वाहतूक 40 मिनिटे रोखून धरली. मात्र रेल्वे पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी करत या सर्व प्रवाशांना ट्रॅकवरुन बाजूला हटवत पुन्हा एकदा रेल्वे वाहतूक सुरू केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तर या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरी गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून पडले.