Home क्राइम वॉच ठाणे जिल्ह्यात हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर धाड; स्वतः राज्य आयुक्त झाले मोहिमेत...

ठाणे जिल्ह्यात हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर धाड; स्वतः राज्य आयुक्त झाले मोहिमेत सहभागी


मुंबई, दि. 24 जून:

राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्ह्यातील अलिमघर, दिवा, घेसर, खरडर्डी, छोटी देसाई, मोठी देसाई, मानेरे गांव, कालवार, भिवंडी, कोरावळे, शहापुर, कुंभार्ली, रायगड जिल्ह्यातील काही गांवामध्ये हातभट्टी दारूनिर्मीती केंद्र धाड टाकून उद्ध्वस्त केली. विशेष म्हणजे राज्य उत्पादन विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वतः या मोहिमेत सहभाग घेतल्याचे दिसून आले.

राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या या कारवाईमध्ये २४ गुन्हे नोंदवत ५९५ लिटर हातभट्टी दारु, ६९ हजार २०० लिटर रसायन आणि इतर भट्टी साहित्य असा एकुण २६ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. तसेच रायगड जिल्हयातील पथकानेही ८ गुन्हे नोंदवून ४ लाख ६७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. या मोहिमेमध्ये उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांच्यासह कोकण विभागाचे उपआयुक्त आणि ठाणे जिल्हा अधिक्षक यांच्यासमवेत स्वतः तीन बोटीमधून मौजे अलिमघर, दिवा, अंजुर खाडीतील हातभट्टी दारू निर्मीतीची ठिकाणे उद्ध्वस्त केली. या कारवाई मध्ये १३० अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

या गुन्ह्यातील आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत आयपीसी कलम ३२८ अन्वये आणि एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सुचना आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी दिल्या आहेत.

या कारवाईमध्ये विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक डॉ.निलेश सांगडे, उपअधीक्षक वैभव वैद्य, डोंबिवली, मुंबई उपनगर, मुंबई शहर, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर विभागाचे निरीक्षक, कर्मचारी तसेच त्यांच्या भरारी पथकांचा समावेश होता.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा