पंजाब पोलीस, एटीएस आणि खडकपाडा पोलिसांची कारवाई
कल्याण दि.9 जानेवारी :
पंजाबमध्ये खून करून फरार असणाऱ्या शार्पशूटरर्सना कल्याणजवळील मोहन्यातून अटक करण्यात आली. पंजाब पोलीसांच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्स, मुंबई एटीएस आणि खडकपाडा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या तिघा गँगस्टर्सच्या मुसक्या आवळण्यात आल्या. हे तिघेही जण पंजाबचा गँगस्टर सोनू खत्री याच्या टोळीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. (Punjab sharpshooters arrested from Mohanya near Kalyan)
शिवम सिंग, गुरुमुख सिंग आणि अमरदीप कुमार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पंजाबमधील नवांशहरमध्ये मख्खन सिंग याची हत्या करून हे तिघे जण भूमिगत झाले होते. यांच्या एका साथीदाराला अटक करून त्याच्या केलेल्या चौकशीत हे तिघे जण महाराष्ट्रात लपून बसल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती.
पंजाब पोलिसांनी मिळालेल्या या विशेष माहितीवरून शोध घेतला असता हे तिघेही जण कल्याणजवळील मोहने परिसरात लपून बसल्याचे निष्पन्न झाले होते. त्याआधारे पंजाब पोलिसांनी मुंबई एटीएस आणि खडकपाडा पोलिसांच्या मदतीने मोहन्यातील यादव नगर परिसरात विशेष ऑपरेशन राबवत या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.