ब्राह्मण सभेत हजारोंच्या संख्येने संपन्न झाला मेळावा
डोंबिवली दि.15 नोव्हेंबर :
आपल्या भारत देशाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा थोर इतिहास असून या दोन्ही ब्राह्मण तज्ञ मंडळींना भारतरत्न मिळायला हवे. पण त्यासाठी हिंदुत्व विचारांचा लोकप्रतिनिधी आपल्याला विधानसभा, लोकसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी पाठवावा लागणार आहे. डोंबिवलीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना पक्षाने चौथ्यांदा उमेदवारी दिली असून हिंदुत्व वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना त्यांना आवर्जून मतदान करणे गरजेचे असल्याचे आवाहन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, प्रखर हिंदुत्ववादी नेते सुनील देवधर यांनी केले. (Public support of Sakal Brahmin community in Dombivli to Ravindra Chavan)
डोंबिवलीतील ब्राह्मण सभेत जमलेल्या हजारो ब्राह्मण मंडळींनी यावेळी महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा सामूहिक निर्णय घेतला. ब्राह्मण सभेत संपन्न झालेल्या सकल ब्राह्मण समाज मेळाव्यामध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
तर भाजपलाच का मतदान करावे याची अनेक उदाहरणे देवधर यांनी दिली. त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांना डोंबिवलीकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. यावेळी अर्थतज्ञ फडणीस यांनीही त्यांचे मौलिक विचार मांडत पंतप्रधान मोदीच का हवेत? या त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या १०१ कारणांपैकी काहींचा उल्लेख करून त्यांनीही यावेळी हिंदुत्ववादी सरकारचे महत्त्व पटवून दिले.
मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शहरातील अपप्रवृत्ती कशा वाढल्या होत्या, त्या समूळ नष्ट करायला किती वेळ गेला याबाबत उदाहरणे देऊन माध्यमांनी जे लिहायला हवे ते परखड शब्दांत विचार मांडले. तसेच शहरातील सर्व ब्राह्मण ज्ञाती समाजाचे पदाधिकाऱ्यांचे आपल्याला सातत्याने मार्गदर्शन मिळत असल्याबद्दल त्यांचा ऋणी असल्याची कृतज्ञता रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
यावेळी माधव घुले, प्रदीप जोशी, जे के जोशी, मनीषा धोपटकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव जोशी, पद्माकर कुलकर्णी, सप्तर्षी, श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्ष अलका मुतालिक, ॲड. वृंदा कुलकर्णी, ब्राह्मण सभा अध्यक्ष राहुल दामले, संदीप पुराणिक, प्रज्ञेश प्रभुघाटे, मानस पिंगळे, मधुकर कुलकर्णी, शशांक खैर, अमरेंद्र पटवर्धन, गौरी खुंटे, शमा भाट्ये यांच्यासह हजारो ब्राह्मण मंडळी यावेळी उपस्थित होती. या कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरम् ने झाली.