Home ठळक बातम्या कल्याण रेल्वेयार्ड पुनर्विकास प्रकल्पासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्या – खासदार...

कल्याण रेल्वेयार्ड पुनर्विकास प्रकल्पासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्या – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

 

कल्याण दि.14 डिसेंबर :
लाखो रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाचा असणाऱ्या कल्याण रेल्वेयार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाचे काम निधीअभावी सुरु होत नसल्याचे सांगत या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लवकरात लकवर निधी उपलब्ध करावा आणि हा प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून गतीने पूर्ण करण्याची मागणी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. लोकसभा अधिवेशनादरम्यान शुन्य प्रहर काळात कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होण्यासाठी कल्याण यार्ड पुनर्विकास (रिमॉडेलिंग) हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पासाठी साधारणपणे ८०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील या कल्याण यार्डच्या रिमॉडेलिंगच्या कामाला २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आली. परंतु आतापर्यंत फक्त ६० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली असून अद्याप या प्रकल्पाचे कोणतेही काम मोठ्या प्रमाणात सुरू झाले नाही. मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई उपनगरीय रेल्वेवरील कल्याण स्थानक हे मध्य रेल्वेच्या सर्वात व्यस्त जंक्शनपैकी एक असून उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या मिळून ७६० गाड्या दररोज कल्याण रेल्वे स्थानकात थांबतात. क्रॉसओव्हर आणि मर्यादित रेल्वे मार्गिकांमुळे गर्दीच्या वेळेत रेल्वे सेवा सुरू होण्यास बराच विलंब होतो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात कल्याण यार्डच्या रिमॉडेलिंगच्या कामाला २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आल्याचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सभागृहात सांगितले. कल्याण यार्डच्या पुनर्विकासामुळे कल्याण जंक्शनची पुनर्बांधणी होणार आहे. याअंतर्गत नवीन रेल्वे मार्गिका तसेच अतिरिक्त ५ प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार असून एकूण प्लॅटफॉर्मची संख्या 12 होणार आहे.

 

रेल्वे माल वाहतूक सेवा, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरी गाड्या यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार असल्याने रेल्वे वाहतुकीची कोणतीही गैरसोय होणार नाही आणि लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे शक्य होणार असल्याचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट करत ८०० कोटींच्या या कल्याण यार्ड रिमॉडेलिंगसाठी आतापर्यंत फक्त ६० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली असून निधीअभावी काम सुरु होत नाहीये. त्यामुळे या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता करावी आणि या प्रकल्पाचे काम वेळेच्या मर्यादेत पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट ठेवून गतीने पूर्ण करण्याची आग्रही मागणी खासदार डॉ. शिंदे यांनी सभागृहात केली.

भविष्यात प्रगत पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह कल्याण स्थानकाचा विकासामुळे नागरिकांचा रेल्वे प्रवास सोयीस्कर होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा