कुष्ठरुग्णांच्या ३५ वर्ष सेवेची केंद्र सरकारकडून दखल
कल्याण डोंबिवली दि.२७ जानेवारी :
सांस्कृतिक नगरी डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. डोंबिवलीकर रहिवासी गजानन माने यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कुष्ठरुग्णांची थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ३५ वर्षे सेवा करून कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने गजानन माने यांना हा पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. (Padmashri award annonces for social worker gajanan mane of Dombivli)
गजानन माने यांना हा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आज केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह प्रमूख महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माने यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तर आपल्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर होण्यामध्ये कुष्ठरुग्णांसोबतच कल्याण डोंबिवली महापालिकेचाही सिंहाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया गजानन माने यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
असा आहे गजानन माने यांचा आतापर्यंतचा प्रवास…
आधी १२ वर्षे नौदलाच्या माध्यामातून देशसेवा आणि नौदलातून निवृत्त झाल्यावर मग तब्बल ३५ वर्षे कुष्ठरुग्णांच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा. १९६२ च्या भारत चीन युद्धाने भारावलेल्या माने घरी काहीही न कळवता १९६५ मध्ये सैनिक म्हणून भारतीय नौदलात भरती झाले. नौदलातील १९६५ ते १९७६ या कालावधीत १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धातील सहभागाबद्दल गजानन माने यांना संग्राम मेडलही मिळाले आहे. सैनिकी कार्यकाळ पूर्ण केल्यानतर १९७६ साली त्यांनी ठाणे येथील एका कंपनीत नोकरी पत्करली या कंपनीच्या उत्कर्षात देखील माने यांचा मोलाचा वाटा राहिला. तर १९८५ ला माने डोंबिवलीत राहायला आले आणि मग कुष्ठ रुग्णांच्या सेवेचा एक नवा अध्याय सुरू झाला.
कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्याज्या ठिकाणी कुष्ठरुग्णांच्या वसाहती आहेत, त्या सर्व वसाहती शासकीय कार्यलय या ठिकाणी कृष्ठरुगाणाचा एक सच्चा मित्र म्हणून माने यांना ओळखले जाते. कुष्ठरुग्णांना रोगमुक्त करणे, त्यांच्या जीवनात आनद निर्माण करणे, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे, रुग्णांच्या मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे आणि त्यासाठी त्यांना मदत करणे हे ध्येय समोर ठेवून गजानन माने यांनी ३५ वर्षे अखंडितपणे त्यांची सेवा केली.
औषधोपचार, उदरनिर्वाहाचे साधन ते मंदिराची स्थापना…
कल्याण येथील हनुमान नगर कुष्ठरुग्णांच्या वसाहतीमधील रुग्णांच्या पुनर्वसनाची जबाबदारी माने यांनी खांद्यावर घेतली आणि त्यात ते यशस्वीही ठरले. या रुग्णांना दवापाणी, मलमपट्टी असे उपचार वेळेवर मिळण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करत केडीएमसीकडून कुष्ठरुग्ण वसाहतीमध्ये स्वतंत्र दवाखाना सुरु करुन घेतला. परिणामी रोगाला बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवण्यात यश आले. तर या रुग्णांच्या कुटुंबाना रोजगार मिळावा आणि उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी माने यांनी पुढाकार घेत कुष्ठरुग्णांच्या कुटुंबातील २५ ते ३० जणाना केडीएमसीमध्ये नोकरी लावली. तर महिलांना स्वतंत्र रोजगार करता यावा म्हणून शिवण कामाचे धडे दिले. दरम्यान माने यांच्या या कार्याची जपानच्या सासाकावा लेप्रसी फौंडेशनने दखल घेत केलेल्या अर्थ सहाय्यातून वसाहतीमध्ये दुग्ध व्यवसाय सुरु करण्यात आला. या प्रकल्पाला जोडून बायोगॅस प्रकल्पाची निर्मितीद्वारे कृष्ठरुग्णांना स्वावलंबनाचे धडे देण्यात आले. कृष्ठरुग्णांना व्याधीमुळे कधीही सर्वसामान्यांच्या मदिरात प्रवेश दिला जात नाही म्हणून रुग्णांच्या ईश्वर भक्तीपोटी वसाहतीच्या आवारातच राधाकृष्णाचे मंदिर बांधण्यात आले.
माने यांच्या कृष्ठ रुग्ण सेवा योगदानात त्यांची पत्नी स्मिता ,मुलगा देवेंद्र आणि योगेंद्र सुना आर्या आणि रावी यांचे मोलाचे योगदान आहे. कृष्ठरुग्णांसाठी माने यांनी केलेल्या कामची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी शिफारस केडीएमसीने राज्यशासनाकडे विशेष ठरावाच्या माध्यमातून २०१७ मध्ये करण्यात आली होती.
ज्याची दखल घेत केंद्र सरकारने यंदाच्या वर्षी गजानन माने या सेवाव्रतीला पद्मश्री या मानाच्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. कल्याण डोंबिवलीच्या दृष्टीने ही अत्यंत मानाची बाब आहे. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांच्यानंतर कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी पद्मश्री मिळवणारे गजानन माने हे देशातील दुसरेच व्यक्ती ठरले आहेत.
त्यांच्या या महान कार्याला एल एन एन परिवाराकडून मानाचा मुजरा..